फोन टॅपिंग प्रकरण; अज्ञात व्यक्तीविरोधात सायबर सेलमध्ये गुन्हा दाखल, देवेंद्र फडणवीसांच्या चौकशीची शक्यता
फोन टेप प्रकरणात पोलीस माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही चौकशी करू शकतात. त्याचबरोबर आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनाही काही दिवसांत चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते.
मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणात अज्ञात व्यक्तीविरूद्ध सायबर सेलमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुप्तचर विभागाचे गोपनीय पत्रे बेकायदेशीररित्या मिळवण्यात आली होती असं तक्रारीत म्हटलं आहे. त्याचबरोबर ऑफिशियल सिक्रेट अॅक्ट 1930 च्या शाखा 5 अंतर्गत भारतीय टेलीग्राम अधिनियम 1885 च्या कलम 30 अन्वये अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फोन टॅपिंग प्रकरणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर गंभीर आरोप केले होते. यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याकडून या प्रकरणाचा अहवाल मागवला होता. कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना तो अहवाल सादर केला आहे. या अहवालात म्हटलं आहे की तत्कालीन गुप्तचर आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सरकारची दिशाभूल केली आणि काही खासगी व्यक्तींचे फोन टॅप केले. कुंटे यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर कडक शब्दात टीका केली आहे.
रश्मी शुक्ला यांच्यावर अनधिकृतरित्या फोन टॅपिंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता : सूत्र
सूत्रांच्या माहितीनुसार, फोन टेप प्रकरणात पोलीस देवेंद्र फडणवीस यांचीही चौकशी करू शकतात. त्याचबरोबर आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनाही काही दिवसांत चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते. वास्तविक पोलिसांना हे जाणून घ्यायचे आहे की गोपनीय कागदपत्रे कुठून लीक झाले आणि कुणी लीक केलीत. देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत ही बाब जनतेसमोर आणली होती.
काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी गुप्तचर विभागाच्या माजी आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या टॉप सिक्रेट कागदपत्रांचा दाखला देत बदली रॅकेट उघडकीस आणले होते. फडणवीस यांनी असा आरोप केला होता की काही एजंट्स आणि राजकीय नेत्यांच्या मदतीने अनेक पोलिस अधिकारी इच्छित पोस्टिंग मिळवण्यात यशस्वी झाले आहेत. 25 ऑगस्ट 2020 रोजी तत्कालीन गुप्तचर आयुक्त रश्मी शुक्ला यांनी एका गुप्त माहितीच्या आधारे अतिरिक्त मुख्य सचिव गृह यांच्याकडून परवानगी घेतल्यानंतर काही फोन टॅप केले होते, ज्यात अनेक खळबळजनक गोष्टी उघडकीस आल्या.
रश्मी शुक्ला या भाजपच्या एजंट म्हणून काम करत होत्या : जितेंद्र आव्हाड
मात्र मुख्य सचिवांनी मुख्यमंत्र्यांना सादर केलेल्या अहवालात दहशतवाद यासारखी कृती पकडण्यासाठी फोन टॅप करण्याची परवानगी दिली असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. आणि त्यासाठीच रश्मी शुक्ला यांनी परवानगी मागितली, जी त्यांना देण्यात आली. परंतु भारतीय टेलीग्राफ कायद्यातील तरतुदींना डावलत रश्मी शुक्ला यांनी दिलेल्या परवानगीचा गैरवापर केला.























