PET EXAM : मुंबई विद्यापीठाच्या पेट प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, याच महिन्यात होणार परीक्षा
Mumbai University PET EXAM : मुंबई विद्यापीठाने पीएचडी आणि एमफील प्रवेश परीक्षेसाठीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. याबाबतचे सविस्तर विषयनिहाय वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
मुंबई : मुंबई विद्यापीठाने पीएचडी आणि एमफील प्रवेश परीक्षेसाठीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यानुसार 25 मार्च रोजी एम. फील. तर 26 आणि 27 मार्च 2021 रोजी पीएचडी प्रवेश परीक्षा होणार आहे. एकूण 79 विषयांसाठी ही परीक्षा ॲानलाईन पद्धतीने होणार असून याबाबतचे सविस्तर विषयनिहाय वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
पेट परीक्षेच्या नियोजनाचा भाग म्हणून दिनांक 12 ते 17 मार्च दरम्यान विद्यार्थ्यांना मॉक ( सराव) परीक्षा देता येईल. यासाठी विद्यार्थ्यांना लघुसंदेश आणि ईमेलवर माहिती पाठविण्यात येणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॅा. विनोद पाटील यांनी सांगितले आहे.
मुंबई विद्यापीठाने गेल्या वर्षी 27 फेब्रुवारी ते 18 मार्च 2020 दरम्यान पेट परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज मागवले होते. त्यात 4 वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. आतापर्यंत विद्यापीठाकडे पेट परीक्षेसाठी 11 हजार 759 एवढे अर्ज प्राप्त झाले असून यामध्ये पीएचडी साठी 11 हजार 352 तर एमफील साठी 407 एवढे अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये पीएचडी साठी 7 हजार 914 एवढे विद्यार्थी असून 6 हजार 437 विद्यार्थीनींचा समावेश आहे. तर एमफील साठी 197 विद्यार्थी आणि 210 विद्यार्थीनींचा समावेश आहे.
पीएचडीसाठी विद्याशाखानिहाय वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेसाठी 2072 , मानव्यविद्या 3299, आंतरविद्याशाखा 689 आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेसाठी 5291 एवढे अर्ज प्राप्त झाले आहेत. तर एमफील प्रवेश परीक्षेच्या 407 अर्जांपैकी वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेसाठी 101, मानव्यविद्या 239, आंतरविद्याशाखा 20 आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेसाठी 47 एवढे अर्ज प्राप्त झाले आहेत. या दोन्ही परीक्षांसाठी महाराष्ट्रातून 11 हजार 22 आणि इतर राज्यातून 737 एवढे अर्ज प्राप्त झाले आहेत.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI