ठाण्यात इमारतीचा भाग कोसळला, आसपासच्या 6 इमारती रिकाम्या
ठाण्यात एका 30 वर्ष जुनी असलेल्या एका इमारतीचा भाग कोसळल्याची घटना घडली. त्यामुळे आसपासच्या 6 इमारती रिकाम्या केल्या आहेत.
ठाणे : आज ठाण्यातील शिवभवन या जुन्या इमारतीचा आतील काही भाग कोसळला. सकाळी साडे पाचच्या सुमारास ही घटना घडली. ही बिल्डिंग धोकादायक असल्याने आधीच रिकामी करण्यात आली होती. 30 वर्ष जुनी, चार माळ्याची ही बिल्डिंग आहे. मात्र, ही जर कोसळली तर आजूबाजूच्या बिल्डिंगला धोका होईल म्हणून बाजूच्या 6 बिल्डिंग ठाणे पालिकेने रिकाम्या केल्या आहेत. एकूण 174 कुटुंबांना बाजूच्या अंबिका आणि आदर्श हायस्कूलमध्ये तात्पुरती सोय करून देण्यात आली आहे.
गुरुवारी ठाण्यात रेकॉर्ड ब्रेक 193 मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. अशातच शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास वागळे इस्टेट भागातील डिसोझा वाडी येथील तळ अधिक चार मजल्याची 30 वर्षे जुनी असलेल्या शिवभवन या इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. सलग दोन वेळा आवाज झाल्याने आजूबाजूच्या रहिवाशांनी या संदर्भात तत्काळ ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला घटनेची माहिती दिली. त्यानंतर घटनेचे गांर्भीय लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन विभागासह अग्निशमन विभागाचे पथक आणि अतिक्रमण विभागाचे पथक घटनास्थळ दाखल झाले. या इमारतीच्या आजूबाजूला अगदी चिकटून चिकटून इमारती उभ्या आहेत. त्यामुळे ही इमारत पडली तर आजूबाजूच्या इमारतींना देखील धोका संभवू शकतो.
ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने येथील आजूबाजूच्या सहा इमारती तत्काळ रिकाम्या करण्यास सुरवात केली. त्यानुसार येथील अष्टमी निवास तळ अधिक चार मजल्याची इमारत (64 कुटुंब), पाडुरंग सदन तळ अधिक चार (24 कुटुंब), श्रीराम निवास तळ अधिक चार (18 कुटुंब), श्रीगणोश निवास तळ अधिक चार (21 कुटुंब), पांडे दुर्गा निवास तळ अधिक चार (29 कुटुंब) आणि राम निवास तळ अधिक चार (18 कुटुंब) अशा एकूण 174 कुटुंबांना तत्काळ बाजूच्या महापालिकेच्या शाळेत स्थलांतरीत करण्यात आले आहे.
आज ज्या कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आलेत त्यांनी लवकरात लवकर पालिकेने आमची कायमस्वरूपी सोय करावी अशी मागणी केली आहे. या संपूर्ण भागात क्लस्टर योजना राबविण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, अजूनही त्याचे घोंगडे भिजत ठेवण्यात आले आहे.