राष्ट्रवादीत गेलेल्या शिवसेनेच्या पाचही नगरसेवकांची घरवापसी, 'मातोश्री'वर पक्षप्रवेश
पारनेर नगरपंचायतीमधील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांची घरवापसी झाली आहे. या नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्याने दोन्ही पक्षांमध्ये तणाव निर्माण झाल्याची चर्चा होती. अखेर आज त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला.
![राष्ट्रवादीत गेलेल्या शिवसेनेच्या पाचही नगरसेवकांची घरवापसी, 'मातोश्री'वर पक्षप्रवेश Parners five corporators who joins NCP to return in Shiv Sena राष्ट्रवादीत गेलेल्या शिवसेनेच्या पाचही नगरसेवकांची घरवापसी, 'मातोश्री'वर पक्षप्रवेश](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/07/08144541/Parner-Corporators-with-CM.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : पारनेर नगरपंचायतीमधील शिवसेनेच्या पाचही नगरसेवकांची घरवापसी झाली आहे. 4 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले पाचही नगरसेवक शिवसेनेत परतले आहेत. पाचही नगरसेवकांनी मुंबईत मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. याआधी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासह या पाचही नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत 20 मिनिटं चर्चा केली होती. या संपूर्ण प्रकरणात शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांच्या मुत्सद्देगिरीला यश आल्याचं म्हटलं जात आहेत.
पारनेर नगरपंचायतीमधील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्याने दोन्ही पक्षांमध्ये तणाव निर्माण झाल्याची चर्चा होती. तसंच शिवसेनेचे नगरसेवक परत पाठवा असा निरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांना पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. मुख्यमंत्री यावरुन नाराज झाल्याचं म्हटलं जात होतं. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये यावर बातचीत झाली. त्यातच काल अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली होती. त्यानंतर आज हे पाचही नगरसेवक शिवसेनेत परतले आहेत.
...म्हणून त्यांना राष्ट्रवादीत घेतलं : आमदार निलेश लंके शिवसेनेचे पाच नगरसेवक भाजपमध्ये जात होते, म्हणून राष्ट्रवादीत घेतले. याबाबत अजित पवार यांना भेटलो होतो. आता शिवसेनेच्या नगरसेवकांनी घरवापसी केली आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांची नाराजी ऐकली, ती दूर करण्याचे आश्वासनही दिल्याचं निलेश लंके यांनी सांगितलं.
अजितदादांनी उद्धव ठाकरेंच्या शब्दाचा मान राखला : मिलिंद नार्वेकर अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या शब्दाचा मान राखला आणि हे नगरसेवक शिवसेनेत परत आले आहेत, असं शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर म्हणाले. महत्त्वाची बाब म्हणजे शिवसेनेच्या नगरसेवकांना परत आणण्यासाठी मिलिंद नार्वेकर यांची मुत्सद्देगिरी कामी आल्याचं समजतं.
पाणी प्रश्नावरुन पारनेरमधील स्थानिक नेतृत्त्वाबाबत नाराजी : घरवापसी केलेले नगरसेवक पारनेरमधील स्थानिक नेतृत्त्वाबाबत आमची नाराजी होती. पारनेरचा पाणी प्रश्न यावरुन नाराजी होती. ती आम्ही उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली. आमदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली पाणी प्रश्न सुटणार असे आश्वासन आम्हाला उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे, अशी माहिती घरवापसी केलेल्या नगरसेवकांनी दिली.
'त्या' नगरसेवकांना अजित पवारांनी फोडलं असं म्हणता येणार नाही : संजय राऊत
पाच नगरसेवक शिवसेनेत पारनेर नगरपंचायतीच्या शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी 4 जुलै रोजी राष्ट्रवादीत प्रवेश केला. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बारामती इथे हा प्रवेश झाला. पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी आज बारामतीत येऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी पारनेर तालुक्यातील शिवसेनेतून निवडून आलेल्या पाच नगरसेवकांना बरोबर आणत थेट राष्ट्रवादीत प्रवेशही घडवून आणला. पारनेर नगरपंचायतीच्या नंदकुमार देशमुख, नंदा देशमाने, वैशाली औटी, डॉ. सय्यद, किसन गंधाडे यांनी आज बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे पारनेरच्या राजकारणात आज एकच खळबळ उडाली आहे. माजी आमदार आणि मंत्री विजय औटी यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. परंतु या पक्ष प्रवेशानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तणाव निर्माण झाल्याचं म्हटलं जात होतं.
पारनेरमधील शिवसेनेचे पाच नगरसेवक परत पाठवा, उद्धव ठाकरे यांचा अजित पवारांना निरोप; सूत्रांची माहिती
अजित पवारांनी आमचे नगरसेवक फोडले असा अर्थ होत नाही : संजय राऊत आमच्या नगरसेवकांनी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला, याचा अर्थ अजित पवारांनी किंवा वरिष्ठ नेत्यांनी नगरसेवक फोडले असा होत नाही. त्यामुळे आता हा विषय आता चर्चेत येऊ नये, असं मला वाटतं," असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. "पारनेरच्या मुद्द्यावर दोन्ही पक्षांमध्ये चर्चा झाली आहे. हा स्थानिक स्तरावरचा विषय होता, तो त्या पातळीवरच संपायला हवा होता. आमच्या काही नगरसेवकांनी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. याचा अर्थ अजित पवारांनी किंवा वरिष्ठ नेत्यांनी नगरसेवक फोडले असा होत नाही. त्यामुळे आता हा विषय आता चर्चेत येऊ नये, असं मला वाटतं. स्थानिक राजकारणाचा भाग होता. यापुढे असा निर्णय घेताना एकमेकांशी बोलावं. काही गोष्टी अनावधनाने घडत असतात. त्या प्रसंगाचं काय होईल याची कल्पना नसते, जिथे व्हायची तिथे चर्चा झाली आहे. त्यामुळे कुरबुरी, धूसफूस आहे असं बोलू नये," असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
...म्हणून त्या नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश : रोहित पवार पारनेरमधील शिवसेनेच्या नगरसेवकांच्या राष्ट्रवादी प्रवेशावरुन आमदार रोहित पवार यांनी खुलासा केला आहे. महाविकास आघाडीत सर्व निर्णय हे वरच्या पातळीवर होतात. त्यामुळे चर्चा झाल्याशिवाय कुठला निर्णय होत नाही, असं रोहित पवार म्हणाले. इतकंच नाही तर राष्ट्रवादीत प्रवेश केलेले पाचही नगरसेवक अंतर्गत राजकारणाला कंटाळून दुसऱ्या पक्षात जाण्याचा विचार करत होते. त्याचा दुष्परिणाम हा महाविकास आघाडीवर होऊ नये, यासाठी त्यांचा प्रवेश राष्ट्रवादी केल्याचं रोहित पवारांनी स्पष्ट केलं.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)