![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Param Bir Singh : परमबीर सिंह यांना सीबीआयकडून क्लीन चिट, खंडणीप्रकरणीचा तपास बंद केला
Mumbai Police : भूखंड बळकावण्यासाठी धमकावणे आणि दोन कोटींची खंडणी वसूल केल्याप्रकरणी मुंबईतील व्यापाऱ्याने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर आरोप केला होता.
![Param Bir Singh : परमबीर सिंह यांना सीबीआयकडून क्लीन चिट, खंडणीप्रकरणीचा तपास बंद केला Param Bir Singh Clean chit to Parambir Singh by CBI investigation in extortion case closed mumbai police marathi news Param Bir Singh : परमबीर सिंह यांना सीबीआयकडून क्लीन चिट, खंडणीप्रकरणीचा तपास बंद केला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/11/a2d342484141aed63d87c9cf8b0fd480_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांना देखील सीबीआयकडून (CBI) क्लीन चीट मिळाली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करुन खळबळ माजवून देणारे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह इतरांविरुद्ध धमकावून खंडणी मागितल्याप्रकरणी ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्याचा तपास आता बंद करण्याचा अहवाल केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे.
खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल केला होता
आपल्या मालकीचा भूखंड बळकावण्यासाठी धमकावणे आणि दोन कोटींची खंडणी वसूल केल्याप्रकरणी व्यावसायिक शरद अग्रवाल यांनी परमबीर सिंग आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. सिंग यांच्या व्यतिरिक्त उपायुक्त पराग मणेरे, संजय पुनमिया, सुनील जैन, मनोज घोटकर यांच्याविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात धमकावणे आणि खंडणीप्रकरणी जुलै 2021 मध्ये गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात पुनमिया आणि जैन यांना अटक झाली होती. मात्र सिंग यांच्यासह इतरांना अटक करण्यात आली नव्हती.
मात्र 24 मार्च 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयाने निकाल देते वेळी सिंग यांच्या विरोधातील पाचही एफआयआर सीबीआयकडे वर्ग करण्याचे आदेश दिले होते. तसेच त्यांना अटकेपासून संरक्षण देखील दिले होते. या प्रकरणी सीबीआयने ठाण्याच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर करुन तपास बंद करण्याची परवानगी मागितली आहे.
सीबीआयने कोर्टात काय म्हटले?
2016-17 साली घडलेला हा गुन्हा सिद्ध करण्यासाठी आवश्यक ते पुरावे उपलब्ध झालेले नाहीत वा आक्षेपार्ह काहीही आढळलेले नाही, असे सीबीआय ने सांगितले.
अग्रवाल हे आर्थिक व्यवहारात प्रामाणिक नाहीत आणि खोट्या दिवाणी आणि फौजदारी खटल्यात व्यक्तींना अडकविण्याचा त्यांचा इतिहास असल्याची बाबही सीबीआयने उघड केली.
अग्रवाल आणि बिल्डर संजय पुनमिया यांच्यात झालेला समझोता कोणत्याही दबावाशिवाय किंवा जबरदस्तीशिवाय झाल्याचे सीबीआयला तपासात आढळून आल्याचे सीबीआयने कोर्टात सांगितले आहे.
परमबीर सिंग यांच्याविरोधात मुंबईतील मरिन ड्राइव्ह, गोरेगाव, अकोला आणि ठाणे येथील ठाणेनगर या पोलिस ठाण्यांमध्ये असे एकूण पाच वेगवेगळे गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी कोपरी इथे दाखल झालेल्या गुन्ह्यात सीबीआयने हा तपास बंद करण्याचा अहवाल सादर केला आहे. मात्र इतर चार गुन्ह्यांचा तपास अजून सुरू आहे.
काय होती तक्रार?
शरद अग्रवाल याचे काका श्यामसुंदर व पुतण्या शुभम यांना नोव्हेंबर 2016 मध्ये अटक झाली. त्यावेळी मनोज घोटकर यांच्यासोबत तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या घरी मदत मागण्यासाठी शरद गेले. तेथे संजय पुनमिया यांच्या सांगण्यावरून परमबीर सिंग, उपायुक्त पराग मणेरे यांनी पुनमिया यांच्याशी समझोता करून घेण्याची धमकी दिली. तसेच पैशांची मागणी केली. पैसे न दिल्यास अग्रवाल यांना 'मोक्का' लावण्याची धमकी दिली. सिंग यांच्या निर्देशावरूनच अग्रवाल याला अटक झाली. एक कोटी रुपये दिल्यानंतर सोडू अशी मागणी केल्याचा असा आरोप होता.
यासंदर्भात गेले काही महिने सीबीआय तपास करत होती. मात्र 18 जानेवारी रोजी पाण्याच्या मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर सीबीआयने तपास बंद करण्याचा अहवाल सादर केला. याच्या विरोधात तक्रारदारांनी ठाणे सेशन कोर्टात अपील केले आहे. त्याची सुनावणी 12 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या सुनावणी मध्ये आणि परमवीर सिंग यांच्या विरोधात असलेल्या इतर गुन्ह्यांमध्ये काय तपास लागतो यावर परमवीर सिंग यांचे भवितव्य अवलंबून आहे.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)