Paper Leak: संपूर्ण यंत्रणा सडलेली, परीक्षा घोटाळ्यावर देवेंद्र फडणवीसांचा घणाघात, पटोलेही म्हणाले चौकशी कराच...
Paper Leak Scam : परीक्षा घोटाळा प्रकरणी विधानसभेत चर्चा करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. काँग्रेस आमदार नाना पटोले यांनीदेखील चर्चा कराच असे म्हटले.
Maharashtra Assembly Session 2021 : राज्यात सुरू असलेल्या परीक्षा घोटाळ्याचे पडसाद अपेक्षेप्रमाणे विधानसभेत उमटले. संपुर्ण शासकीय यंत्रणा सडलेली असून या सरकारच्या काळात एकही परिक्षा घोटाळ्याच्या बाहेर झाली नाही, अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. न्यासा कंपनीला अपात्र केल होत मात्र त्यानंतर त्यांना पात्र करण्यात आल्याचे सांगताना सभागृहात गुरुवारी चर्चेची मागणी फडणवीस यांनी केली. तर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी चर्चेची मागणी करताना या घोटाळ्याची तार कुठपर्यंत जात आहे हे समजले पाहिजे अशी मागणी केली.
मागील काही दिवसांपासून राज्यात भरती परीक्षेच्या मुद्यावरून गोंधळ सुरू आहे. विधीमंडळ अधिवेशनात याचे पडसाद उमटणार असल्याचे म्हटले जात होते. विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी परीक्षा घोटाळ्याच्या मुद्यावरून सरकारवर टीका केली. आरोग्य भरती परीक्षेत मोठा गोंधळ झाला. न्याया या कंपनीला अपात्र केले होते. त्यानंतर ही पुन्हा काही दिवसांनी या कंपनीला कंत्राट देण्यात आले. इतर कंपन्यांनाही परीक्षा घेण्याचे कंत्राट देता आले असते असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. जी.ए. टेक्नॉलॉजी कंपनीला काळ्या यादीत होती. या कंपनीला तीन महिन्यात पुन्हा या कंपनीला काळ्या यादीतून बाहेर काढले असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
आरोग्य खात्याच्या भरती परीक्षेतील उमेदवारांना परीक्षा केंद्रही इतर ठिकाणची आली होती. माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी प्रसिद्ध केलेल्या ध्वनिफितीमध्ये दलालाने अनेक दावे केले होते. एकट्या अमरावती जिल्ह्यात 200 जणांनी दलालाला पैसे दिले होते. संपूर्ण शासकीय यंत्रणा सडलेली आहे. प्रशांत बडगीरे यांच्या वाहन चालकाकडे प्रश्नपत्रिकेचा संच सापडला. या घोटाळ्यांवर चर्चा झाली पाहिजे अशी आग्रही मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली.
होऊ द्या चर्चा; नाना पटोलेंचे प्रतिआव्हान
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनीदेखील परीक्षा घोटाळा प्रकरणाची चर्चा झाली पाहिजे अशी मागणी केली. परीक्षा घोटाळा प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. या प्रकरणात आतापर्यंत काय कारवाई झाली, या प्रकरणाचे तार कुठंपर्यंत आहे याची माहिती राज्याला मिळाली पाहिजे. या प्रकरणाची काही कागदे आमच्याकडे देखील आहे, त्यामुळे परीक्षा घोटाळा प्रकरणाची चर्चा झाली पाहिजे अशी मागणी नाना पटोले यांनी केली.