एक्स्प्लोर
Advertisement
अंबरनाथ पालिकेच्या कॉल सेंटरमधून खासगी डॉक्टरांची दलाली? होम क्वारंटाईन रुग्णांना पॅकेजची ऑफर
अंबरनाथ शहरात कोरोना पॉझिटिव्ह होम क्वारंटाईन रुग्णांच्या सुविधेसाठी पालिकेनं कॉल सेंटर सुरू केलं आहे. मात्र या कॉल सेंटरमधून खासगी डॉक्टरांची दलाली सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
अंबरनाथ : अंबरनाथ शहरात कोरोना पॉझिटिव्ह होम क्वारंटाईन रुग्णांच्या सुविधेसाठी पालिकेनं कॉल सेंटर सुरू केलं आहे. मात्र या कॉल सेंटरमधून खासगी डॉक्टरांची दलाली सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
अंबरनाथ शहरात सध्या 496 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यापैकी 103 रुग्ण हे होम क्वारंटाईन आहेत. या रुग्णांच्या देखरेखीसाठी आणि त्यांना काय हवं नको ते पाहण्यासाठी अंबरनाथ पालिकेनं कॉल सेंटर सुरू केलं आहे. मात्र या कॉल सेंटरमधून रुग्णांना चक्क खासगी डॉक्टरांची सेवा घेण्याची ऑफर दिली जातेय. रुग्ण यासाठी तयार झाल्यास डॉक्टरांकडून त्याला मेसेज पाठवला जातो ज्यात 10 दिवसांसाठी 5 हजार रुपयांची मागणी केली जाते. यासाठी अकाऊंट नंबर आणि अन्य माहितीही रुग्णाला पुरवली जाते. काही रुग्णांच्या नातेवाईकांनी हा सगळा प्रकार समोर आणला आहे.
या सगळ्यात अंबरनाथ पालिकेच्या कोव्हिड कंट्रोल रूममध्ये कार्यरत एका डॉक्टरचं नाव सूत्रधार म्हणून समोर येतं आहे. या डॉक्टरला पालिकेनं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कामावर घेतलं असून कोरोना रुग्णांच्या देखरेखीचं आणि नियोजनाचं काम त्याच्याकडे आहे. मात्र प्रत्यक्षात पालिकेतून रुग्णांची माहिती चोरून पालिकेचीच यंत्रणा वापरत रुग्णांची ही लूट सुरू असून त्यामुळे या डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. मनसेनं याप्रकरणी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
या सगळ्या प्रकरणाची अंबरनाथ पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी खातेप्रमुखांना लेखी स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसंच यात पालिकेचा कुणी कर्मचारी दोषी आढळल्यास त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरील कुणाचा यात सहभाग आढळला तर त्यांना थेट कामावरून काढून टाकण्यात येईल, असा इशारा मुख्याधिकारी रसाळ यांनी दिला आहे.
एकीकडे अंबरनाथ शहरातले अनेक खासगी डॉक्टर्स पालिकेच्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये निस्वार्थीपणे सेवा देत आहेत. तर दुसरीकडे मात्र अशाप्रकारे काही डॉक्टर्स रुग्णांची लूट करत असल्यानं प्रामाणिकपणे काम करणाऱ्या डॉक्टरांच्या मेहनतीवरही पाणी फिरत असल्याचं बोललं जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
नाशिक
निवडणूक
Advertisement