
भिवंडीत खासगी कोविड रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा; रुग्णांसह नातेवाईकांची चिंता वाढली
भिवंडीत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतानाच खासगी कोविड रुग्णालयातील ऑक्सिजन साठा संपल्याने रुग्णालय प्रशासनासह रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरलं आहे.

भिवंडी : भिवंडीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढली आहे. त्यातच शहरातील कोविड रुग्णालयामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने रुग्णांना इतरत्र हलवण्याची वेळ खासगी कोविड रुग्णालयावर आली आहे. विशेष म्हणजे शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतानाच रुग्णालयातील ऑक्सिजन साठा संपल्याने रुग्णालय प्रशासनासह रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरलं आहे.
भिवंडी महापालिकेच्या वतीने शहरात खुदाबक्ष हॉल हे एकमेव कोविड सेंटर सध्या सुरु आहे. तर शहरात सुमारे 13 खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. या खासगी रुग्णालयांपैकी धामणकर नाका येथील ऑरेंज हॉस्पिटल आणि सिराज हॉस्पिटलसह इतर खासगी कोविड रुग्णलयामधील ऑक्सिजन साठा संपल्याने एकच खळबळ उडाली होती. रुग्णालयाला ऑक्सिजन साठा पुरवणाऱ्या कंपनीकडून पुरवठा न मिळाल्याने ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे ऑक्सिजन साठा उपलब्ध नसल्याने रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना इतरत्र हलवण्याची सूचना देखील रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तसंच नवीन रुग्णांना या रुग्णालयात सध्या ऑक्सिजनअभावी प्रवेश देखील देता येत नसल्याची माहिती रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून मिळाली आहे. तर रुग्णालयात अचानक ऑक्सिजन साठा संपल्याने आणि रुग्णांना इतरत्र हालाविण्याची सूचना हॉस्पिटल प्रशासनाने केल्याने काही काळ नातेवाईकांची ऑक्सिजन बेड मिळवण्यासाठी एकच धावपळ उडाली आहे.
ऑरेंज हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी सध्या 60 बेड्स आहेत. त्यापैकी 21 बेड्स सध्या भरलेले आहेत. मात्र या 21 रुग्णांना आवश्यक असलेला ऑक्सिजन पुरवठा देखील संपल्याने नातेवाईकांची एकच धावपळ उडाली होती.
भिवंडी शहरात ऑक्सिजन साठा कमी आहे. सध्या महानगरपालिकेकडे सुद्धा कमी आहे. सुमारे 14 हजार लिटर ऑक्सिजन मनपाकडे शिल्लक आहे. ज्यादा साठा मिळावा यासाठी शासनाच्या एफडीए औषध पुरवठा शाखेकडे मागणी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
