'आयाराम गयाराम, जय श्रीराम', राधाकृष्ण विखे-पाटलांसमोर विरोधकांची घोषणाबाजी
या सरकारच्या पहिल्या अधिवेशनात शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांचीही विरोधी नेतेपदावरून मंत्रीपदी वर्णी लागली. त्यामुळे आता विजय वड्डेटीवार विरोधी पक्षनेते झाले आहेत, त्यांना निवडणूक होईपर्यंत पक्षात घेऊ नका, असा टोला अजित पवारांनी लगावला.
मुंबई : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीला विरोधी पक्षातून सत्ताधारी पक्षात सहभागी झालेल्या आणि मंत्रीपदी वर्णी लागलेल्या राधाकृष्ण विखे पाटलांना विरोधकांनी टार्गेट केलं. राधाकृष्ण विखे पाटील विधानभवनात येताच विरोधकांनी 'आयाराम गयाराम, जय श्रीराम'ची घोषणाबाजी सुरु केली.
विधानसभेत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी याच मुद्द्यावरुन मुख्यमंत्र्यांना टोला लगावला. एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते झाले त्यांना तुम्ही सत्ताधारी केले, राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्षनेते झाले त्यांना पक्षात घेतले. आता विजय वड्डेटीवार विरोधी पक्षनेते झाले आहेत, त्यांना निवडणूक होईपर्यंत पक्षात घेऊ नका, असं अजित पवार यांनी म्हटलं.
2014 ची विधानसभा निवडणूक शिवसेना-भाजप स्वतंत्रपणे लढली होती. त्यावेळी पहिल्या अधिवेशनात शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली होती. मात्र काहीच महिन्यात भाजपने शिवसेनेसोबत युती केली आणि एकनाथ शिंदे यांची मंत्रीपदी वर्णी लागली.
वारंवार निष्ठा बदलणे योग्य नाही, त्यामुळे इतर कोणत्या पक्षात सहभागी होणार नाही. मी सत्ता बदलूनच सत्ताधारी पक्षाच्या बाजूला येणं पसंत करेन, अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर लगेच त्यांना मंत्रिपद कसं काय दिलं जाऊ शकतं? असा सवालही अजित पवारांनी उपस्थित केला. त्यावर उत्तर देतांना मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की, पात्र व्यक्तीला मंत्री करता येते. पक्षाचा राजीनामा देऊन मंत्री झाल्यानं कायद्याचा कोणताही भंग होत नाही.