Varsha Gaikwad, Mumbai North Central : वर्षा गायकवाडांना अंतर्गत विरोध सुरुच; अर्ज दाखल करण्यापूर्वीच मुंबई काँग्रेस नेते एकटवले
नसीम खान यांची नाराजी ताजी असतानाच आज मुंबई काँग्रेस नेते वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारीविरोधात एकवटले आहेत. वर्षा गायकवाड मतदारसंघात बाहेरच्या उमेदवार असल्याचा आरोप होत आहे.
Varsha Gaikwad, Mumbai North Central : मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांचे नाव मुंबई उत्तर मध्यमधून पक्षाच्या उमेदवार म्हणून जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, माजी मंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते नसीम खान यांनी पक्षाच्या स्टार प्रचारकपदाचा राजीनामा दिला आणि महाविकास आघाडीने (एमव्हीए) एकही उमेदवार अल्पसंख्याक समाजातून उभा न केल्याचा निषेध केला होता. नसीम खान यांची नाराजी ताजी असतानाच आज मुंबई काँग्रेस नेते वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारीविरोधात एकवटले आहेत. वर्षा गायकवाड मतदारसंघात बाहेरच्या उमेदवार असल्याचा आरोप होत आहे, अशा परिस्थितीत त्यांना काँग्रेसच्या स्थानिक घटकाचा पाठिंबा मिळणे अत्यंत गरजेचे आहे. उद्धव सेनेच्या स्थानिक नेटवर्कचाही वर्षा यांना फायदा होणार आहे.
नसीम खान यांच्यासह भाई जगताप, सुरेश शेट्टी चंद्रकांत हंडोरे आणि इतर पदाधिकारी एकत्र आले आहेत. वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारीला विरोध करण्यासाठी ही बैठक होत आहे. विशेष म्हणजे वर्षा गायकवाड उद्या (29 एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वीच काँग्रेसच्या मुंबईतील नेत्यांची बैठक सुरू झाली आहे.
दोन महिन्यांपूर्वी मला पक्षाची उमेदवारी देण्याचा निर्णय
दुसरीकडे, नसीम खान यांनी राजीनामा देताना “दोन महिन्यांपूर्वी मला पक्षाची उमेदवारी देण्याचा निर्णय झाला होता. त्यामुळे मुंबईतील अल्पसंख्याक समाजात उत्साह संचारला होता. तथापि, पक्षाने या जागेवरून वेगळे नाव जाहीर केले आहे, ज्यामुळे अल्पसंख्याक समाजात अशांतता निर्माण झाली आहे,” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
“मी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि इतर राज्यांमध्ये पक्षाच्या आदेशांचे पालन करत आहे. मी प्रामाणिकपणे आदेश पूर्ण केले. पण एकाही अल्पसंख्याक सदस्याला उमेदवारी का दिली नाही? असा प्रश्न अल्पसंख्याक समाजाने विचारला तर मी आता अवाक् होईन. त्यामुळे मी तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात पक्षाचा स्टार प्रचारक म्हणून पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे, असेही ते म्हणाले.
दुसरीकडे, काँग्रेससाठी बलाढ्य मानल्या जाणाऱ्या उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपने उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देऊन ही लढत रंजक बनवली आहे. दोन्ही बाजूंनी उमेदवार जाहीर झाल्यानंतर आता कामाला सुरुवात झाली आहे. आशिष शेलार यांनी निकम यांच्यासाठी भेटीगाठी सुरू केल्या आहेत. राजकारणात नवोदित असलेले उज्ज्वल हे प्रसिद्ध वकील आहेत, तर चार वेळा आमदार राहिलेल्या वर्षा गायकवाड या प्राध्यापक आहेत.