एक्स्प्लोर
'मराठी अभिमान गीताचं सातवं कडवं सरकारने गाळलं', विरोधकांचा आरोप
‘मराठी अभिमान गीताची सात कडवी असून फक्त 6 कडवी असलेलं पत्रक वाटलं, सरकारने एक कडवं का गाळलं?’
मुंबई : कविश्रेष्ठ कुसुमाग्रज अर्थात वि.वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिनानिमित्त “मराठी भाषा गौरव दिन” साजरा केला जात आहे. यानिमित्तानं विधीमंडळात आज मराठी अभिमान गीताचं सामूहिक गायन करण्यात आलं. पण यानंतर विरोधकांनी सभागृहात नव्या वादाला तोंड फोडलं.
‘मराठी अभिमान गीताची सात कडवी असून फक्त 6 कडवी असलेलं पत्रक वाटलं, सरकारने एक कडवं का गाळलं?’ असा सवाल अजित पवार यांनी केला. ‘मराठी अभिमान गीत सुरु असताना अचानक माइक बंद पडला याबाबतही अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली. हे कोणी मुद्दाम करतयं का? याची चौकशी करा, हे कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिलं आणि त्यातून कोणाला काय मिळतं? हे या तपासून बघा.’ असंही अजित पवार यावेळी म्हणाले. त्यानंतर सर्वच विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं.
राज्य सरकारने माफी मागावी : विखे-पाटील
यावेळी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी देखील सरकारवर टीकास्त्र सोडलं. ‘सरकारने मराठी अभिमान गीतातील सातवं कडवं गाळलं. त्यामुळे राज्य सरकार महाराष्ट्राची माफी मागावी.’ असं विखे-पाटील म्हणाले.
दरम्यान, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली.
सातवं कडवं गाळण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला? : जयंत पाटील
‘सुरेश भटांच्या कवितेतील सातवं कडवं गाळण्याचा अधिकार सरकारला दिलाच कुणी? त्यामुळे आता तुम्हाला मराठी भाषेबाबत बोलण्याचा अधिकारच राहिलेला नाही.’ असं म्हणत जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. जयंत पाटलांच्या या शाब्दिक हल्ल्यानंतर मुख्यमंत्रीही आक्रमक झाले आणि त्यांनीही पाटलांना प्रत्युत्तर दिलं.
जयंत पाटलांना मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर
‘कोण मुख्यमंत्री असताना सुरेश भट्टांनी हे कडवं कधी लिहलंय हे सुद्धा तुम्ही तपासावे. जर आम्हाला अधिकार नसेल तर तुम्हाला कोणी अधिकार दिला?’ असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.
गौरव गीतात शेवटच्या कडव्याचा उल्लेख केला जात नाही : भाजप आमदार
दरम्यान, यावेळी भाजप आमदार मेधा कुलकर्णी यांनी असा दावा केला की, ‘राष्ट्रगीतात देखील अनेक कडवी आहेत. पण ती सर्वच कडवी बोलली जात नाहीत. तसंच मराठी भाषा गौरव गीतात शेवटच्या कडव्याचा उल्लेख केला जात नाही’
VIDEO :
मराठी अभिमान गीतातील सातवं कडवं कोणतं?
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी
विनोद तावडेंचं निवेदन :
या सर्व वादानंतर सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी या सर्व वादावर स्पष्टीकरणही दिलं. यासंबंधी त्यांनी सभागृहात निवेदन दिलं. ‘कविवर्य सुरेश भट्ट यांच्या रुपगंधा काव्य संग्रहात सहा कडवी छापून आले होते. एका कार्यक्रमात सातवं कडवं त्यांनी उत्स्फूर्त म्हटलं होतं. त्यानंतर बऱ्याच आवृत्त्या आल्या, त्यातही सातवं कडवं नाही.’
मराठी गौरव गीताचे संगीतकार कौशल इनामदार यांचा ब्लॉग
यंदाच्या २७ फेब्रुवारीला – मराठी भाषा दिनी मराठी अभिमानगीताच्या प्रकाशनाला ३ वर्ष पूर्ण झाली आणि पुन्हा एकदा यूट्यूबवर असलेल्या मराठी अभिमानगीताकडे लोकांचा ओघ वाढला. मराठी लोकांचा या गीताला भरभरून प्रतिसाद मिळाला. कौतुकाचा वर्षाव जसा या गीतावर झाला तसेच काही प्रश्नही उपस्थित केले गेले.
त्यातला वारंवार विचारला जाणारा प्रश्न म्हणजे मराठी अभिमानगीतामध्ये शेवटच्या चार ओळी का नाही घेतल्या? त्या ओळी खालीलप्रमाणे आहेत.
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरीच हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी
आता मराठी अभिमान गीतात या ओळी न घेण्याचं कारण समजावून घेण्याकरिता या कवितेचा इतिहास तपासणं आवश्यक आहे. मूळ कविता संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या दरम्यान कधीतरी कविवर्य सुरेश भटांनी लिहिली होती. ‘रूपगंधा’ या त्यांच्या पहिल्या संग्रहात ही कविता प्रथम छापून आली होती. तेव्हां या चार ओळी लिहिल्याच गेल्या नव्हत्या.
त्यामुळे इथे पहिला ठळक मुद्दा लक्षात घेण्यासारखा हा आहे की मूळ कवितेमध्ये या ओळी नव्हत्या!
पुढे १९८०च्या दशकात सुरेश भटांच्या एका कायाक्रमात (ज्या कार्यक्रमाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे उपस्थित होते) या चार ओळी भटांनी म्हटल्या. आज आपल्याला सुरेश भटांच्या आवाजात ज्या ओळी ऐकू येतात त्या याच कार्यक्रमातल्या आहेत असा माझा अंदाज आहे. म्हणजे मूळ कवितेनंतर साधारण २० वर्षांनी या ओळी सुरेश भटांनी लिहिल्या!
पण त्यानंतरच्या ‘रूपगंधे’च्या कुठल्याही, अगदी, शेवटच्या आवृत्तीतसुद्धा या ओळी आपल्याला आढळत नाहीत. याचं कारण काय असावं?
खुद्द सुरेश भटांनीसुद्धा या ओळी छापील स्वरूपात जनतेसमोर का येऊ दिल्या नाहीत?
- कौशल इनामदार
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी
आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी
आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी
येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी
*पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी*
कवी - सुरेश भट
संबंधित बातम्या :
गुजराती अनुवाद प्रकरणावर मुख्यमंत्र्यांचा माफीनामा
राज्यपालांच्या भाषणाचा अनुवाद गुजरातीमधून, विरोधक आक्रमक
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
सोलापूर
क्राईम
Advertisement