Sanjay Raut : शिवसेनेत फक्त बाळासाहेब ठाकरेंचा एकच गट, अजूनतरी गटबाजीनं पोखरलं नाही : संजय राऊत
Sanjay Raut : शिवसेनेत फक्त बाळासाहेब ठाकरेंचा एकच गट आहे. तो म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचा, असं संजय राऊत बोलताना म्हणाले. तसेच प्रताप सरनाईक आणि त्यांचं कुटुंब सध्या अडचणीत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांकडून त्यांना त्रास दिला जातोय, पण शिवसेना पक्ष त्यांच्या पाठीशी आहे, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये समन्वय आहे. तिनही पक्ष एकमेकांशी उत्तम समन्वय राखून आहेत आणि सर्व पक्ष हे उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहेत, असं संजय राऊत यांचं म्हणणं आहे. प्रताप सरनाईक आणि त्यांचं कुटुंब सध्या अडचणीत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांकडून त्यांना त्रास दिला जातोय, पण शिवसेना पक्ष त्यांच्या पाठीशी आहे, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत बोलताना म्हणाले की, "प्रत्येकजण आपापल्या पक्षाचा विस्तार करत असतो. आम्हीदेखील करत असून राष्ट्रवादी आणि काँग्रेसही करेल. कोणी कशा पद्धतीने लढायचं यावर कोणतीही चर्चा झालेली नसून ती योग्य वेळी होईल. सरकार पाच वर्ष चालवायचं यासाठी तिन्ही पक्षांची बांधिलकी आहे. सरकार चालवताना मी आधीही अनेकदा सांगितलं आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, बाळासाहेब थोरात, नाना पटोले आणि दिल्लीतील नेतेही नेहमी किमान समान कार्यक्रम सरकार चालवण्याचा मुख्य आधार असल्याचं सांगत असतात."
"मुख्यमंत्र्यांसोबत आम्ही सर्व जण आहोत. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकमेकांसोबत मजबुतीने उभे आहोत. सत्ता गेल्याने ज्यांच्या पोटात दुखत आहे त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी सरकार पाच वर्ष चालणार. कितीही फूट पाडण्याचा प्रयत्न केला तरी यश मिळणार नाही. महाविकास आघाडीमध्ये असणारा समन्वय देशाच्या राजकारणात आदर्श आहे. आघाडीचं सरकार कसं चालवावं त्याचा उत्तम फॉर्म्यूला महाराष्ट्रात आहे.", असं विश्वास संजय राऊत यांनी बोलताना व्यक्त केला आहे.
शिवसेनेत दोन गट आहेत का? असं विचारल्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, "आमच्या पक्षात कोणतेही गट नाहीत. शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे हा एकमेव गट आहे. उद्धव ठाकरे प्रमुख आहेत आणि आम्ही सर्व त्यांच्या नेतृत्वात काम करत आहोत. आमच्याकडे अजून तो आजार आलेला नाही".
"मी सरकारमध्ये नाही, त्यामुळे त्याविषयी बोलू शकत नाही. पण ते शिवसेनेचे सन्माननीय सदस्य आणि आमदार आहेत. ते आणि त्यांचं कुटुंब त्रासात, अडचणीत आहे. अडचणींचं कारण त्यांनी त्यांच्या पत्रात सांगितलं आहे. भाजप केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन विनाकारण त्रास देत असल्याचं त्यांना म्हटलं आहे. त्या त्रासातून सुटका करुन घेण्यासाठी मोदींशी जुळवून घ्यावं, असं त्यांनी सांगितलं आहे. ते त्यांचं मत आहे. पण पक्षाची भूमिका उद्धव ठाकरेंनी सर्वांशी बोलून घेतली आहे. निर्णय घेण्याचा अधिकार त्यांच्याकडे असून विनाकारण होणाऱ्या त्रासाचा सामना कसा करावा यासाठी संपूर्ण पक्ष प्रताप सरनाईक त्यांच्या पाठीशी आहे", असं संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत म्हणाले की, "प्रताप सरनाईक हे आमदार आणि शिवसेनेच्या कुटुंबाचे सदस्य आहेत. ते आणि त्यांचं कुटुंब त्रासात असून त्यांच्या मागे ज्याप्रकारे केंद्रीय यंत्रणांना लावण्यात आलं आहे ते पाहता असं संकट कोणावरही येता कामा नये. पण या संकटाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ठाकरे कुटुंब, शिवसेना त्यांच्या पाठीशी आहे. गरज लागेल ती मदत केली जाईल,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.
दरम्यान, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. तसेच महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा युती केली तर शिवसेनेला फायदा होईल, असं प्रताप सरनाईक यांनी या पत्रात नमूद केलं आहे. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते फोडत आहेत, असा बॉम्ब सरनाईक यांनी या पत्रातून टाकला आहे. केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा टाळण्यासाठी काही मंत्र्यांची केंद्राशी हातमिळवणी सुरु आहे, असा आरोपही शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी या पत्रातून केला आहे. एबीपी माझाच्या हाती हे पत्र लागलं असून प्रताप सरनाईक यांनी 10 जून रोजी हे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :