अभी तो असली लड़ाई मुंबई में होगी : देवेंद्र फडणवीस
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला खुलं आव्हान दिलं आहे. "अभी तो असली लड़ाई मुंबई में होगी," असं ते म्हणाले.
![अभी तो असली लड़ाई मुंबई में होगी : देवेंद्र फडणवीस Now the real fight will be in Mumbai, Devendra Fadnavis challenges Shiv Sena ahead of BMC Election 2022 अभी तो असली लड़ाई मुंबई में होगी : देवेंद्र फडणवीस](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/11/3c82ca3c6dc43662f3dd19f099075e29_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : "विजयाने नम्र व्हायचं, विजयाने अधिक मेहनत करायची आहे. अभी तो असली लड़ाई मुंबई में होगी," असं म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला खुलं आव्हान दिलं आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाचे शिल्पकार ठरलेले देवेंद्र फडणवीस यांचं आज मुंबई भाजप प्रदेश कार्यालयात जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना विजयाने हुरळून न जाता खरी लढाई मुंबईत होणार असल्याचं सांगत त्यांना कामाला लागण्याचे निर्देश दिले.
चार राज्यांच्या निवडणुकीचा निकालामधून संपूर्ण देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू अनुभवली. मोदींनी सामान्य माणसांच्या मनात विश्वास निर्माण केला. तो विश्वास खऱ्या अर्थाने मतांच्या रुपात परिवर्तित झाला. गोव्यातील विजय हा मोदींचा आहे, आपल्या त्यात खारीचा वाटा आहे, असं फडणवीस म्हणाले.
शिवसेनेला आव्हान
परंतु विजयाने हुरळून न जाता अधिक मेहनतीने काम करायचं आहे. कारण आता खरी लढाई मुंबईत होणार आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं. ते म्हणाले की, "विजयाने नम्र व्हायचं, विजयाने मेहनत करायची आहे. अभी तो असली लडाई मुंबई में होगी. मुंबईला कोणत्या पक्षापासून वेगळं करायचं नाही. आम्हाला मुंबईला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुक्त करायचं आहे. आम्ही कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही. आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात मैदानात उतरलो आहोत. मुंबई महापालिकेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढत नाही तोपर्यंत दम घेता येणार नाही. आज विजय साजरा करा, उद्यापासून कामाला लागा. मुंबईत भाजपचा पूर्ण विजय आणि महाराष्ट्रात भाजपचं बहुमताचं सरकार येण्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज राहायला हवं."
शिवसेनेची लढाई आमच्याशी नाही तर नोटाशी, फडणवीसांचा टोला
सत्कारानंतर संबोधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गोव्या विजयासाठी मी महाराष्ट्रातील भाजपचे आमदार, खासदार आणि कार्यकर्त्याचे विशेष आभार मानतो. त्यांनी महाराष्ट्रातून सेना गोव्यात पाठवली." "ही सेना म्हणजे भाजपची, दुसऱ्या सेनेचे काय झालं ते पाहिलं," असा टोलाही त्यांनी लगावला. ते पुढे म्हणाले की, "ते (शिवसेना) त्या ठिकाणी गर्जना करत होते, आम्ही भाजपला हरवायला आलोय. मी त्यावेळीच सांगितलं होतं की त्यांची लढाई आमच्याशी नाही तर नोटाशी आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रित मतेही नोटापेक्षाही कमी आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराला केवळ 97 मतं मिळाली."
गोव्यात फडणवीस यांची रणनीती यशस्वी
गोवा विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्तिश: लक्ष घातले होते. गोव्याचे प्रभारी म्हणून जबाबदारी मिळाल्याच्या दुसर्याच दिवशी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि इतर पदाधिकार्यांना त्यांनी मुंबईला जेवायला बोलावले आणि लगेच सूत्रे हाती घेतली. त्यानंतर महाराष्ट्रात विविध राजकीय वादळं घोंगावत असताना सुद्धा एक पाय गोव्यात तर एक पाय महाराष्ट्रात अशी त्यांची स्थिती होती.
सुमारे 50 हून अधिक सभा देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: घेतल्या. अगदी छोट्या-छोट्या समूहात कार्यकर्त्यांच्या सुद्धा सभा घेतल्या. बारकाईने काटेकोर नियोजन, प्रचंड आवाका, सूक्ष्म पातळीवर आखणी, संपूर्ण जबाबदारी स्वत: अंगावर घेणे, कुठेही कुणावर विसंबून न राहणे, सातत्याने बारीकसारीक बाबींचा फॉलोअप यामुळेच हा अपेक्षित निकाल लागू शकला. यापूर्वी गोव्यात सलग तीन निवडणुकांमध्ये फडणवीस यांनी प्रचार केला आहे. त्यामुळे गोव्याचा स्वभाव आणि रस्ता न रस्ता त्यांना माहिती आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)