फोन टॅपिंगप्रकरणी फडणवीसांना नोटीस; उद्या BKC पोलीस स्थानकात हजर राहणार, भाजपकडून शक्ती प्रदर्शन होण्याची शक्यता
रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) फोन टॅपिंगप्रकरणी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीशीनंतर देवेंद्र फडणवीस हे उद्या पोलिस स्टेशनमध्ये उपस्थित राहणार आहेत.
Devendra Fadnavis News : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत वेगवेगळ्या मुद्यांवर भाष्य केलं. रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) फोन टॅपिंगप्रकरणी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीशीनंतर देवेंद्र फडणवीस हे उद्या पोलिस स्टेशनमध्ये उपस्थित राहणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनात उद्या भाजपकडून शक्ती प्रदर्शन होण्याची शक्यता आहे. BKC पोलीस स्टेशन समोर मोठ्या प्रमाणावर देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थक कार्यकर्ते जमण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्या मुंबईत भाजपकडून पुन्हा एकदा जोरदार शक्तिप्रदर्शन होऊ शकतं.
काय आहे फोन टॅपिंग प्रकरण
फोन टॅपिंगप्रकरणी पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावर कुलाबा पोलीस ठाण्यात टेलिग्राफ कायद्यांतर्गत मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. हा गुन्हा रद्द करण्यात यावा, या मागणीसह शुक्ला यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर शुक्रवारी तातडीची सुनावणी पार पडली. यापूर्वी फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांच्यावर पुण्यातील बंड गार्डन पोलीस स्थानकांतही गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याविरोधात शुक्लां यांना नुकताच मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला असून 25 मार्चपर्यंत त्यांच्याविरोधात कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे पुणे पोलिसांना निर्देश देण्यात आले आहेत. याच प्रकरणात आता फडणवीसांना देखील चौकशीसाठी हजर राहण्याबाबत नोटीस देण्यात आली आहे.
फडणवीस म्हणाले, 'माझ्या माहितीचा स्रोत विचारलं जाऊ शकत नाही'
BKC च्या सायबर पोलिसांनी मला बोलवलं आहे. माझ्या माहितीचा स्रोत विचारला जाऊ शकत नाही. मी कोणतीही माहिती लिक केलेली नाही. राज्य सरकारच्या एक मंत्र्याने ती माहिती माध्यमांना दिली. त्याचे पुरावे आहेत. मी उद्या पोलीस ठाण्यात जाणार असून चौकशीला सहकार्य करणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या गृहमंत्रालयातील महाघोटाळ्यासंदर्भात मला अशाच चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. मी पोलिसांना पूर्ण सहकार्य करणार आहे. उद्या बीकेसी येथील पोलीसांसमोर मी हजर होईन, त्यांच्या प्रश्नांना योग्य ती उत्तरे देईन, असं ते म्हणाले. राज्य सरकार आणि पोलीस यांना उत्तर सुचत नाहीये त्यामुळे मला नोटीस पाठवली गेली आहे, असंही ते म्हणाले.