मुंबईच्या Hyatt Regency हॉटेलकडे कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी पैसे नाहीत, कामकाज बंद
मुंबईतील हयात रिजेन्सी (Hyatt Regency) हॉटेलकडे आता कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठीही पैसे उरलेले नाहीत. परिणामी हॉटेलचं कामकाज बंद करण्यात आलं आहे.

मुंबई : कोरोना संसर्गाची दुसरी लाट आदरातिथ्य आणि पर्यटन क्षेत्रासाठी (Hospitality and Tourism) कहर ठरत आहे. मुंबईतील हयात रिजेन्सी (Hyatt Regency) हॉटेलकडे आता कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठीही पैसे उरलेले नाहीत. परिणामी हॉटेलचं कामकाज बंद करण्यात आलं आहे, यावरुन हे संकट किती गहरं आहे, याचा अंदाज येऊ शकतो.
हॉटेलने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, "निधीचा तुटवडा असल्याने पुढील आदेशापर्यंत हॉटेल बंद राहिल. हॉटेल चालवणारी कंपनी एशियन हॉटेल्सकडे (West) निधी शिल्लक नाही, यामुळे कामकाज बंद करावं लागत आहे."
हॉटेल प्रशासनाने काय म्हटलं?
हयात रिजेन्सीने या पत्रकात म्हटलं आहे की, "हयात रिजेन्सी मुंबई चालवण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी हॉटेलचे मालक असलेल्या एशियन हॉटेल्स वेस्ट लिमिटेडकडून कोणताही निधी येत नसल्याची माहिती हॉटेलच्या सर्व ऑन-रोल स्टाफला दिली आहे. त्यामुळे हॉटेलचं सर्व कामकाज तात्पुरत्या स्वरुपात तात्काळ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हॉस्पिटॅलिटी सेक्टरवर सर्वात परिणाम
हॉटेल आता पुढील आदेशापर्यंत बंद राहिल. मागील वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाच्या पहिल्या लाटेमुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली. यामुळे टुरिझम आणि ट्रॅव्हलशी संबंधित आदरातिथ्य क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला आहे. शिवाय या क्षेत्राला सरकारकडून कोणत्याही प्रकारचं पॅकेज मिळालेलं नाही.
कोरोना संकटात नागरिकांनी केवळ गरजेपुरताच प्रवास केला आहे. आता जरी रेस्टॉरंटसह इतर गोष्टींचं कामकाज सुरु झालं तर कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली आहे. अनेक महिने हॉटेल तसंच रेस्टॉरंट बंद होते, ग्राहक-पाहुणे आलेले नाहीत. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांना पगार कसा आणि कधीपर्यंत द्यावा, असा प्रश्न कंपन्यांसमोर उभा आहे. इतकंच नाही एखाद्या पाहुण्यासाठी या हॉटेलचा दररोजचा खर्चही मोठा असतो. परिणामी पैशांअभावी हॉटेल हयात रिजेन्सी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.























