(Source: Poll of Polls)
दिलासादायक! 18 वर्षांवरील 99 टक्के मुंबईकरांनी कोरोना लशीचा पहिला डोस घेतला
Mumbai Vaccination Update : मुंबईसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. 18 वर्षांवरील 99 टक्के मुंबईकरांनी कोरोना प्रतिबंधक लशीचा पहिला डोस घेतला आहे.
Mumbai Vaccination Update : मुंबईसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. 18 वर्षांवरील 99 टक्के मुंबईकरांनी कोरोना प्रतिबंधक लशीचा पहिला डोस घेतला आहे. म्हणजे फक्त 1 टक्का मुंबईकर पहिल्या डोसपासून अद्याप वंचित आहेत. तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या 63 टक्क्यांच्या घरात आहे. दीड कोटी मुंबईकरांचं लसीकरण पूर्ण झाल्याबद्दल देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
कोविड-१९ प्रतिबंधक राष्ट्रीय लसीकरण मोहीम अंतर्गत मुंबई महानगरामध्ये पहिली आणि दुसरी मात्रा मिळून एकूण दीड कोटी मात्रा देण्याची कामगिरी काल साध्य करण्यात आली. यामध्ये मुंबईतील सर्व शासकीय, महानगरपालिका व खासगी लसीकरण केंद्रांवरील लसीकरणाचा समावेश आहे. काल सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत 92 लाख 4 हजार 950 (99 टक्के) नागरिकांनी पहिली मात्रा घेतली आहे. तर 58 लाख 62 हजार 933 (63 टक्के) नागरिकांनी दुसरी मात्रा घेतली आहे. मुंबईतील सर्व शासकीय, महानगरपालिका व खासगी लसीकरण केंद्रांचा यामध्ये समावेश आहे. कोविड लसीकरणासाठी केंद्र सरकारकडून संचालित होत असलेल्या कोविन संकेतस्थळावर नोंदविण्यात आलेली ही आकडेवारी आहे.
मुंबई महानगरात वेगाने व अधिकाधिक नागरिकांचे कोविड लसीकरण करण्यासाठी विशेष लसीकरण सुरु करण्यात आले. लसीकरण केंद्रांवर जास्त वेळ रांगेत उभे रहावे लागू नये म्हणून 4 मे पासून ज्येष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह-इन लसीकरण सुरु करण्यात आले. स्तनदा मातांसाठी 26 मे पासून तर विदेशात शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी अथवा नोकरी / व्यवसायासाठी जाणाऱ्यांकरीता 1 जून पासून लसीकरण राबविण्यात येत आहे. शारीरिक व मानसिकरित्या दुर्बल व्यक्तिंसाठी 23 जून, गर्भवती स्त्रियांसाठी आणि शासकीय ओळखपत्र नसलेल्या नागरिकांसाठी 14 जुलै 2021 पासून लसीकरण हाती घेण्यात आले. तर, वैद्यकीय कारणांनी व वयोमानाने अंथरुणास खिळून असलेल्या नागरिकांच्या घरी जाऊन 2 ऑगस्ट 2021 पासून लसीकरण राबविण्यात येत आहे.
यासोबतच, दिव्यांग व्यक्ती, आदिवासी बांधव, कारागृहांमधील बंदिवान, एलजीबीटी समुदायातील नागरिक इत्यादींसाठी विशेष केंद्र, फक्त महिलांसाठी राखीव विशेष लसीकरण सत्र, शिक्षक आणि 18 वर्ष वयावरील विद्यार्थी यांच्यासाठी राखीव सत्र, फक्त दुसरा डोस देय असणाऱया नागरिकांसाठी राखीव सत्र अशा निरनिराळ्या उपाययोजना महानगरपालिकेने केल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून सर्व समाज घटकांपर्यंत पोहोचून सर्वाधिक वेगाने लसीकरण करण्यात मुंबई आघाडीवर आहे. समाजातील कोणताही घटक लसीकरणातून वंचित राहणार नाही, याची पुरेपूर दक्षता प्रशासन घेत आहे.
जनगणनेच्या सांख्यिकी आधारे आणि पात्र नागरिकांची संख्या लक्षात घेता, शासनाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना आपापल्या क्षेत्रात लसीकरणाचे उद्दिष्ट निश्चित करुन दिले आहे. त्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुमारे 92 लाख 36 हजार 500 पात्र नागरिकांचे कोविड लसीकरण (दोन्ही मात्रा मिळून) करायचे आहे.