ठाण्यातील नवीन बांधलेल्या कोपरी ब्रिजला तडे, पुल वाहतुकीस धोकादायक, मनसेचा आरोप, IITमार्फत तपासणी सुरु
पूर्व द्रुतगती महामार्गाच्या वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी कोपरी येथे नवीन पुल बांधण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यापैकी 2 लेनचे काम पूर्ण झाले असताना यापैकी एका मार्गिकेवर तडे गेले असल्याचे मनसेने निदर्शनास आणून दिले आहे. हा पूल वाहतुकीस धोकादायक असल्याचा आरोप देखील मनसेने केला आहे.
ठाणे : पूर्व द्रुतगती महामार्गाच्या वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी कोपरी येथे नवीन पुल बांधण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यापैकी 2 लेनचे काम पूर्ण झाले असताना यापैकी एका मार्गिकेवर तडे गेले असल्याचे मनसेने निदर्शनास आणून दिले आहे. हा पूल वाहतुकीस धोकादायक असल्याचा आरोप देखील मनसेने केला आहे.
ठाणे आणि मुंबईत राहणाऱ्या नागरिकांसाठी वाहतूक कोंडी मुक्त पूर्व द्रुतगती महामार्गाच्या स्वप्न शिवसेनेने गेली कित्येक वर्षे दाखवले आहे. त्यासाठी कोपरी येथे जुन्या रेल्वे पुलाचा जागी नवीन सहा मार्गिका असलेला ब्रिज उभारण्याचे दोन टप्प्यातले काम सुरू करण्यात आले. त्यापैकी पहिल्या टप्प्याचे काम पूर्णत्वास आले असतानाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पहिल्या टप्प्यात ज्या दोन मार्गिका नवीन बांधण्यात आलेल्या आहेत त्यापैकी मुंबईकडे जाणाऱ्या मार्गे केवळ मोठमोठ्या भेगा पडलेल्या असून त्याखाली जे ब्लॉक्स लावण्यात आलेली आहेत ते देखील तुटले असल्याचे मनसेने निदर्शनास आणून दिले आहे.
"या पुलाची वाट गेली अनेक वर्षे ठाणेकर बघत आहेत. जेव्हा हा पूल तयार झाला तेव्हाच हे तडे समोर आले आहेत. येणाऱ्या काळात जर अवजड वाहने यावरून गेली तर नक्कीच हा पुल कोसळेल, थुकपट्टी लावण्याचे काम इथे करण्यात आले असून, याची जबाबदारी पालकमंत्र्यांची आहे", असे अविनाश जाधव यांनी सांगून पुलाच्या कामाचे ऑडिट आय आय टी मार्फत करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
यासंदर्भात आम्ही ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि या नवीन पुलाची मागणी करणारे राजन विचारे यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला मात्र राजन विचारे यांनी याबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला तर एकनाथ शिंदे यांनी फोनवरून यासंदर्भात आय आय टी तपासणी करत असल्याचे सांगितले.
नवीन कोपरी ब्रिजचे स्वप्न दाखवून किमान दोन निवडणूक तरी शिवसेनेने लढवले असतील. तसेच आता या फुलाचे पहिल्या टप्प्यातील काम झाल्यानंतर देखील येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्याचे श्रेय शिवसेना घेईल. पण श्रेय घेण्याच्या नादात ब्रिजचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे का? आणि येणाऱ्या काळात जर अपघात झाला तर त्याची जबाबदारी देखील शिवसेना घेणार का? असा सवाल विचारला जात आहे.