Neil Somaiya: नील यांच्या अटकपूर्व जामीनावरील सुनावणी पूर्ण, उद्या फैसला
भाजप नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील यांनी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
मुंबई: जमीन खरेदी प्रकरणात अटकेची भीती निर्माण झाल्यानं भाजप नेते किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्यानं अटकपूर्व जामीनसाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. त्या अर्जावर सोमवारी युक्तिवाद पूर्ण झाला असून सत्र न्यायालय मंगळवारी आपला निकाल जाहीर करणार आहे.
न्यायाधीश दीपक भागवत यांच्यासमोर या याचिकेवर सुनावणी पार पडली. नील यांच्याविरोधात अद्याप कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही त्यामुळे याप्रकरणी कोणताही गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही. मात्र असं असलं तरी त्यांच्याविरोधातील आरोप हे राजकीय हेतूनं प्रेरित आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधीत कठोर कारवाई करण्याच्या 72 तास आधी नोटीस देण्यात द्यावी, अशी मागणी सोमय्या यांच्यावतीने ज्येष्ठ विधीज्ञ अशोक मुंदरगी यांनी केली. त्यावर नील यांच्या विरोधात गुन्हाच दाखल करण्यात आला नसल्यामुळे तसं कोणतंही आश्वासन देता येणार नाही, असं राज्य सरकारकडून कोर्टात स्पष्ट करण्यात आलं. दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकून घेत न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला असून तो मंगळवारी जाहीर करण्यात येणार आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांविरोधात दररोज नवनवे घोटाळ्यांचा बाहेर काढण्याचा सपाटाच भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी सुरू केला होता. त्या विरोधात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन "बाप बेटे जेल जाएंगे" असा नारा देत किरीट सोमय्या यांच्या मुलाने बाजारभावापेक्षा कमी किंमतीत जमीन खरेदी केल्याचा दावाही केला होता. हा व्यवहार नीलच्या मालकीच्या `निकॉन इन्फ्रा' च्या माध्यमातून झाला असल्याचेही राऊत यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर अन्य एका प्रकरणात नीलला पोलिसांनी चौकशीसाठी ठाण्यातही बोलावले होते. त्यामुळे आपल्याविरोधात एफआयआर दाखल होण्याआधीच नीलने सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे.
संबंधित बातम्या: