पालघर तालुक्यात राष्ट्रवादीची मनसे सोबत हातमिळवणी, मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण
मनसेने जिंकलेली एक जागा कायम राखण्यासाठी उमेदवाराने कंबर कसली आहे. त्यासाठी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेससोबत घरोबा केला आहे.
पालघर : पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीमधील प्रचारात रंगत वाढू लागली आहे. सर्वच पक्ष स्वबळावर निवडणुकीत उतरले असले तरी काही जागांवर छुप्या आघाड्या केल्या जात आहेत. वाडा तालुक्यात मनसे भाजपसोबत गेली असताना, पालघर तालुक्यात मात्र मनसेने राष्ट्रवादीसोबत घरोबा केला आहे. पालघर तालुक्यात पंचायत समितीची जिंकलेली एक जागा कायम राखण्यासाठी मनसेने राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करणारी मनसे राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तसेच आमदार सुनील भुसारा मनसेसोबत केलेल्या आघाडीबाबत अनभिज्ञ आहेत. त्यामुळे आमदारांनाच आपला पक्ष गोपनीय गोष्टींपासून दूर ठेवत आहे की काय अशा चर्चेला उधाण आले आहे.
वर्षभरापूर्वी पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत माण पंचायत समिती गणात मनसेचे योगेश पाटील निवडून आले होते. पालघर तालुक्यातून मनसेचा एकमेव उमेदवार निवडून आल्याने मनसेमध्ये उत्साहाचे वातावरण होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे माण पंचायत समिती गणातील सदस्य पद रद्द झाले होते. त्यानंतर पडलेल्या आरक्षणात माण पंचायत समिती गण सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाला आहे.
मनसेने जिंकलेली एक जागा कायम राखण्यासाठी उमेदवाराने कंबर कसली आहे. त्यासाठी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेससोबत घरोबा केला आहे. दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी आपसात संगनमत करून एकमेकांना साहाय्य करण्याची ठरवले आहे. माण पंचायत समिती गणात मनसेने राष्ट्रवादी काँग्रेसची सोबत केली आहे. त्याबदल्यात धुकटन पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला मनसेने पाठिंबा दिला आहे.
पालघर तालुक्यात मनसे उमेदवाराच्या बॅनरवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा फोटो झळकल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बॅनरवर मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांचा फोटोला स्थान देण्यात आले आहे. राज्य स्तरावर मनसेचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करत असताना पालघर तालुक्यात मनसे राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याची चर्चा पालघर तालुक्यात जोर धरत आहे. वाडा तालुक्यात भाजप सोबत आणि पालघरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सोबत घरोबा करणाऱ्या मनसे बाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे या सर्व घडामोडी बाबत आमदार सुनील भुसारा हे अनभिज्ञ असल्यामुळे विविध विषयांना फाटे फुटताना दिसत आहे.