राष्ट्रवादीकडून 50-50 टक्के जागांचा फॉर्म्युला, काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिका यांनी दिली.

मुंबई : मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाली आहे. यावेळी आगामी निवडणुकीत जिंकून येण्याच्या निकषावर जागावाटप होईल असं राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं. तर ऑक्टोबर शेवटपर्यंत आघाडीची चर्चा पूर्ण होईल, असं काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिका यांनी दिली. गुरुवारी दिल्लीमध्ये राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाली. यावेळी काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, अशोक गहलोत आणि राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल उपस्थित होते.
नवाब मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 50-50 टक्के जागांचा प्रस्ताव राष्ट्रवादीने काँग्रेसपुढे ठेवला आहे. या प्रस्तावावर काँग्रेसने भूमिका स्पष्ट केलेली नसून काँग्रेसच्या निर्णयाची राष्ट्रवादी प्रतिक्षा करत आहे.
लोकसभा निवडणुकीबाबत प्राथमिक चर्चा झाली आहे. इतर पक्ष आमच्याबरोबर येणार आहेत, त्यांच्याबरोबरही आम्ही चर्चा करत आहोत. राहुल गांधी आणि शरद पवार यांची बैठक झाली, त्या बैठकीत ठरल्याप्रमाणे ऑक्टोबर शेवटपर्यंत आघाडीची चर्चा पूर्ण होईल, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली.
काँग्रेसने 2014 लोकसभा निवडणुकीत राज्यात 26 जागांवर आपले उमेदवार दिले होते, त्यापैकी केवळ दोन विजयी झाले होते. तर राष्ट्रवादीने 22 जागांवर आपले उमेदवार दिले होते, त्यापैकी चार उमेदवार विजयी झाले होते.
Before You Go
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम






















