26 खासदार असलेली व्यक्ती पंतप्रधान होऊ शकते, तर 48 खासदार असलेला मावळा का नाही? : अमोल कोल्हे
काही दिवसांपूर्वी अजित पवारांना मुख्यमंत्रीपदी बसलेलं पाहायचं आहे असं म्हटलेल्या राष्ट्रवादीचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी आज शरद पवार यांना पंतप्रधानपदी पाहायची मनिषा बोलून दाखवली.
मुंबई : काही दिवसांपूर्वी अजित पवारांना मुख्यमंत्रीपदी बसलेलं पाहायचं आहे असं म्हटलेल्या राष्ट्रवादीचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी आज शरद पवार यांना पंतप्रधानपदी पाहायची मनिषा बोलून दाखवली. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात कोल्हे म्हणाले की, 26 खासदार असलेल्या गुजरातमधील व्यक्ती पंतप्रधानपदी बसू शकते तर 48 खासदार असलेल्या महाराष्ट्रातील व्यक्ती का नाही? कोल्हे यांच्या या वाक्यानंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
अमोल कोल्हे (Amol kolhe) यांनी म्हटलं की, पवार हे शाहू महाराजांचे वैचारिक वारसदार आहेत. महिलांना लष्करात भरती, राजकारणात आरक्षण देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि त्याची अमंलबजावणी केली. याच महिलांना आज प्रगतीची शिखरे गाठली आहेत. त्यामुळे शरद पवार हे फुलेंचे वैचारिक वारसदार आहेत. त्यांचं मार्गदर्शन आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आहे. पवार हे गेली चाळीस वर्ष दिल्लीतील राजकारणाची ओळख बनून राहिले आहेत. आमच्या नेत्याला पाच लाखाचा सूट घालावा लागत नाही. हजारो रुपयांचे तैवानी मशरुम खावे लागत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. बिहार, पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर त्यांचे नेते शरद पवार साहेबांना भेटायला येतात, त्यामुळे नेहमीच 'हर अर्जुन का सारथी' हे त्यांना लागू होते, असं कोल्हे म्हणाले.
देशातील कुठल्याही नेत्याला पवारांचं मार्गदर्शन घ्यावं लागतंय, असं ते म्हणाले. त्यांनी म्हटलं की, भुज भूकंपावेळी शरद पवार यांची अटल बिहारी वाजपेयी यांनी वाहवा केली होती. आता मात्र संप्रदायिकांचे हादरे या देशाला बसत आहेत. त्या टोकदार भाल्याने देश रक्त बंबाळ होत आहे. टोकाची भूमिका निर्माण होत आहे त्यामुळे तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे. जर 26 खासदार असलेल्या गुजरातमधील व्यक्ती पंतप्रधानपदी बसू शकते तर 48 खासदार असलेल्या महाराष्ट्रातील व्यक्ती का पंतप्रधानपदावर बसू शकत नाही. याचा विचार करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.
पंतप्रधानांनी शरद पवारांना सांगितलं कोरोनात इतकं फिरु नका, पण... : प्रफुल्ल पटेलांनी सांगितला किस्सा
यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं की, पंतप्रधान मोदी यांनी मला सांगितलं की शरद पवार यांना सांगा कोरोनामध्ये इतके फिरू नका, ते जिकडं तिकडं जात आहेत. पूर आला, वादळ आलं ते त्याठिकाणी जात आहेत. त्यांना म्हणावं तब्येतीची काळजी घ्या. परंतु मी त्यांना म्हटलं ते कुणाचे ऐकत नाहीत. कायम जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतात, असं पटेल म्हणाले.
संबंधित बातम्या
देशासमोर आज अनेक प्रश्न, यावर आपल्यालाच उपाय शोधायचा आहे ; शरद पवार यांचे आवाहन