सरकार पाच वर्षे टिकवायचं असेल तर समन्वय ठेवा, राष्ट्रवादीच्या बैठकीत शरद पवारांचा मंत्र्यांना सल्ला
महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष टिकवायचं असेल तर योग्य समन्वय ठेवा, असा सल्ला राष्ट्रवादीच्या बैठकीत शरद पवारांनीचा मंत्र्यांना दिला. वादग्रस्त मुद्दे टाळण्याच्याही सूचना दिल्या.
मुंबई : महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्ष टीकवायचं असेल तर सगळ्यांनी समन्वव ठेवा. सरकार आणि पक्षात मतभेद निर्माण होतील, अशी वक्तव्य टाळा, असा सल्ला शरद पवारांनी आपल्या मंत्र्यांना दिला. कोणत्याही मंत्र्याने एखादा निर्णय घेताना मुख्यमंत्र्यांशी समन्वय साधा, असंही शरद पवारांनी बैठकीत सांगितलं. राष्ट्रवादीचे सर्व मंत्री, खासदार सुप्रिया सुळे, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार सुनील तटकरे या बैठकीला उपस्थित होते.
महाविकास आघाडी सरकारच्या खातेवाटपानंतर शरद पवारांनी आपल्या मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेतला. प्रत्येक मंत्र्यांने आपण काय काम केलं, याचा लेखाजोखा शरद पवारांसमोर मांडला. महाविकास आघाडी सरकार आल्यापासून तिन्ही पक्षातील नेत्यांच्या वक्तव्यांमुळे, काही निर्णयांमुळे प्रसारमाध्यमात वारंवार महाविकास आघाडीत मतभेद असल्याच्या बातम्या आल्या. भाजपकडूनही ऑपरेशन लोटसची चर्चा सुरू होती. त्यामुळे आपलं सरकार टीकवायचं असेल तर सगळ्यांनी समन्वय ठेवणे गरजेचं आहे. पक्षांमध्ये मतभेद निर्माण होतील, अशी वक्तव्ये टाळली पाहिजेत, असा सल्ला शरद पवारांनी दिला.
गेल्या काही दिवसात राज्यातील राजकीय वातावरण एल्गार परिषदेचा तपास NIA कडे देण्यावरून ढवळून निघालं. तपास NIA सोपवण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सहमती दर्शवली आहे. तपास NIA कडे गेला तरी राज्य सरकारने एल्गार परिषद प्रकरणी SIT नेमून तपास करावा आणि विशेषतः पुणे पोलिसांच्या भूमिकेबाबत तपास व्हावा, ही भूमिका शरद पवारांनी मांडली होती. आजच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांचा सूर होता, की राज्य सरकारने समांतर चौकशी केली पाहिजे. त्यामुळे बैठकीनंतर गृहमंत्री अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलून निर्णय होणार असल्याचं सूतोवाच केलं.
जिल्ह्यामध्ये संपर्कमंत्री नेमण्याचा निर्णय
आघाडी सरकार असताना राज्यातील ज्या जिल्ह्यात पक्षाचा पालकमंत्री नसतो, त्या जिल्ह्यात संपर्कमंत्री नेमला जातो. काँग्रेसने आधीच आपले संपर्कमंत्री नेमले असून आजच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसने संपर्कमंत्री नेमण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच महाविकास आघाडी लवकरच महामंडळावरच्या नेमणुका करणार आहे. या नेमणुकींबाबत देखील शरद पवारांनी सूचना दिल्या आहेत. महामंडळाच्या नियुक्त्या करताना ज्या नेत्याची, कार्यकर्त्यांची नाव जिल्हा कार्यकारणीकडून येणार, त्यांच्या नावाचा ठराव होणार आणि त्यांना महामंडळावर संधी देण्याचा निर्णय झाला.
NPR बाबत राष्ट्रवादीची सावध भूमिका
NPR बाबत राष्ट्रवादीने सावध भूमिका घेतली आहे. जनगणना होणार आहे, त्याला पक्षाचा विरोध नाही. त्याची तयारी झाल्याचे मंत्री नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं. NPR च्या प्रश्नावलीबाबत मात्र अजून निर्णय झाला नसून लवकरच तिन्ही पक्षातील नेते एकत्र बसून निर्णय घेतील, असं नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं.
राष्ट्रवादीचे मंत्री आता पक्ष कार्यालयात जनता दरबार घेणार आहेत. जेणेकरुन जनतेला तिथे थेट मंत्र्यांना भेटून आपली कामं सांगता येतील. पक्ष कार्यालयाचे महत्व टिकलं पाहिजे, यासाठी हा प्रयत्न आहे. तसेच येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढवणार असल्याने त्या संदर्भात इतर मित्र पक्षांबरोबर चर्चा, समन्वय ठेवा, अशा सूचनाही शरद पवार यांनी आज दिल्या.