आमचा नाद करणारेच एक दिवस बाद होतील, कुटुंबाविषयी बोलणाऱ्यांना रोहित पवारांचा टोला
सूडाच्या भावनेच्या राजकारणातून विरोधी पक्षांकडून साहेबांना आणि दादांना जो त्रास दिला जातो, तेवढा त्रास जर तुमच्या आजोबांना किंवा काकांना दिला गेला असता तर तुम्ही काय केलं असतं? असा सवाल रोहित पवारांनी विचारला.
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या आमदारकीच्या राजीनाम्यानंतर ते नाराज असल्याची चर्चा जोरदार होती. तसेच गृहकलह त्यांच्या राजीनाम्याचं कारण असल्याचा तर्कही लावला जात होते. पवार कुटुंबाविषय बोलणाऱ्यांना शरद पवारांचे नातू आणि राष्ट्रवादीचे युवानेते रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं.
पवार कुटुंबियांचा नाद करणारेच एकदिवस बाद होऊन जातील, असं रोहित पवार यांनी फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. "माझ्या आजोबांच्या म्हणजेच पवार साहेबांच्या ठिकाणी तुम्ही स्वतःच्या आजोबांना ठेवा आणि माझ्या अजित काकांच्या ठिकाणी तुम्ही आपल्या काकांना गृहीत धरा. सूडाच्या भावनेच्या राजकारणातून विरोधी पक्षांकडून साहेबांना आणि दादांना जो त्रास दिला जातो, तेवढा त्रास जर तुमच्या आजोबांना किंवा काकांना दिला गेला असता तर तुम्ही काय केलं असतं? लक्षात ठेवा जिथे प्रामाणिक प्रेम असतं तिथेच एवढ्या प्रामाणिक भावना असतात. अजित दादांच्या आजच्या भावनाच आमच्या कुटुंबातील एकमेकांवर असलेलं प्रेम दाखवून देतात", असं रोहित पवारांनी म्हटलं.
मी आपल्या सर्वांना एवढच सांगेन की, पवार कुटुंबाला कितीही त्रास देण्याचा प्रयत्न होऊदे, पण आमचं कुटुंब एवढं मजबूत आहे की आमचा नाद करणारेच एकदिवस बाद होऊन जातील. मी मागे पण सांगितलं आहे की अजिबात कशाची काळजी करू नका, आपला गडी लै खंबीर हाय. समाजाप्रती जे आपलं कर्तव्य आहे ते पवार कुटुंबीय आजपर्यंत पार पाडत आलंच आहे आणि यापुढेही हे काम सुरूच राहील, असं म्हणत रोहित पवारांनी कुटुंबातील कलहाविषयी बोलणाऱ्यांची तोंडं बंद करण्याच प्रयत्न केला.
अजित पवारांचं राजीनाम्यावर स्पष्टीकरण
शरद पवारांचं नाव शिखर बँक घोटाळा प्रकरणात आल्यानं अस्वस्थ होऊन मी राजीनामा दिला. ज्या पक्षानं मला मान-सन्मान व पदं दिली त्या पक्षाविरोधात काही करण्याचा विचारही करू शकत नाही, अशा शब्दात अजित पवारांनी आपल्या राजीनाम्याबाबत स्पष्टीकरण दिलं आणि राष्ट्रवादीला सोडण्याच्या किंवा अन्य शक्यतांनाही त्यांनी फेटाळून लावलं.
संबंधित बातम्या