Nawab Malik : ED ने किरीट सोमय्यांना अधिकृत प्रवक्ता केलं का?; नवाब मलिक यांचा सवाल
Nawab Malik : ईडीने बोलावल्यास आपण स्वत:च ईडी कार्यालयात जाणार असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले.
Nawab Malik on ED : ईडीने भाजप नेते किरीट सोमय्या यांना अधिकृत प्रवक्ता केलंय का असा थेट सवालच राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिकांनी आपल्या घरी ED किंवा इतर केंद्रीय तपास यंत्रणांची धाड पडणार असल्याचं एक सूचक ट्वीट केल्यानंतर अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या. आज पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. वक्फ जमीन घोटाळाप्रकरणात भाजपच्या एका नेत्यावर कारवाई होणार असल्याचे भाकितही मलिक यांनी वर्तवलं.
मागील काही दिवसांपासून भाजपचा नेता ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांच्या घरी छापामारी करत असल्याचे पत्रकारांना सांगत आहे. वक्फ प्रकरणी ईडी माझ्या घरी येणार असे किरिट सोमय्या यांनी म्हटले. ED ने किरीट सोमय्या ना अधिकृत प्रवक्ता केलं का? असा प्रश्नही त्यांनी विचारला. ईडीने बोलावल्यास मी स्वत: त्यांच्या कार्यालयात जाणार आहे असे मलिक यांनी स्पष्ट केले. ईडीने अधिकृत माहिती द्यावी, मीडियात बातम्या पेरून राज्याला बदनाम करण्याचे काम बंद करावे असेही मलिक यांनी म्हटले.
वक्फ बोर्डाबाबत काय म्हणाले?
नवाब मलिक यांनी वक्फ जमीन घोटाळ्याबाबतही भाष्य केले. पुणे वक्फ प्रकरणात ईडीने तपास केला. वक्फ बोर्डाच्या सात कार्यालयात छापे टाकले. ईडीने वक्फच्या एका अधिकाऱ्याला दोन दिवस बोलावले आणि चुकीच्या पद्धतीने एफआयआर दाखल केला असल्याचे मलिक यांनी म्हटले. 'वक्फ'च्या प्रकरणात भाजप नेत्यांवर कारवाई होणार असल्याचे मलिक यांनी म्हटले.
आतापर्यंत कोणत्या नेत्यांवर कारवाई
राज्यात गेल्या दोन वर्षांपासून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदांचा सपाटा लावत महाविकास आघाडीच्या वेगवेगळ्या नेत्यांवर आरोप केले. त्या नेत्यांवर नंतर ED आणि वेगवेगळ्या तपास यंत्रणांनी धाडी टाकल्या. त्यामध्ये सुरवात शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्यापासून झाली. त्यानंतर अनिल देशमुख, अजित पवारांचे नातेवाईक, हसन मुश्रीफ, भावना गवळी आणि अर्जुन खोतकर, प्राजक्त तनपुरे या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर ईडीच्या धाडी पडल्या. तसेच अनिल परब, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेकांवर आरोप झाले.