राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक भाजपमध्ये जाणार नाहीत?
संदीप नाईक यांनी कालच आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सुपूर्द केला होता. त्यामुळे आज फक्त संदीप नाईक आणि नवी मुंबई महापालिकेचे माजी महापौर सागर नाईक भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.
नवी मुंबई : माजी मंत्री, राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक कुटुंबासह आज भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र गणेश नाईक भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीत अशी माहिती समोर येत आहे. त्यांच्यासोबत येणाऱ्या नगरसेवकांचाही आज प्रवेश होणार नाही.
नवी मुंबई महापालिकेच्या 52 नगसेवकांसह गणेश नाईक भाजपमध्ये प्रवेश करणार होते. मात्र काही नगरसेवक भाजपात जाण्यास इच्छुक नसल्याची माहिती समोर आली आहे. 10 ते 15 नगरसेवक राष्ट्रवादीत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणेश नाईक भाजपमध्ये जाणार नसल्याची चर्चा आहे.
संदीप नाईक यांनी कालच आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सुपूर्द केला होता. त्यामुळे आज फक्त संदीप नाईक आणि नवी मुंबई महापालिकेचे माजी महापौर सागर नाईक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मात्र गणेश नाईक यांच्या प्रवेशाबद्दल अजूनही सांशकता कायम आहे.
आमदार मंदा म्हात्रे नाराज
नाईक कुटुंबियांच्या भाजप प्रवेशाच्या घोषणेनंतर नवी मुंबईतील भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी नाराजी व्यक्त केली. नाईक आपले साम्राज्य वाचविण्यासाठी भाजपात येत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. भाजप पक्षाबद्दल त्यांना आपुलकी नाही. बेलापूरमधून आपल्यालाच उमेदवारी मिळणार असून आपण आमदार असल्याचा मंदाताई यांनी आधीच दावा केला आहे.
नाईक कुटुंबियांचं शिवसेनेकडून स्वागत
नाईक कुटुबियांच्या भाजप प्रवेशाच्या घोषणेनंतर शिवसेनेनं त्यांच्या निर्णयाचं स्वागत केलं होतं. नवी मुंबई महापालिकेत शिवसेना 38 आणि भाजप 6 असे युतीचे 44 नगरसेवक आहेत. मात्र आता राष्ट्रवादीचे 50 हून अधिक नगरसेवक भाजपात आले तर युतीचं संख्याबळ 95 पर्यंत पोहोचेल, याचं शिवसेना नेते विजय चौगुले यांनी स्वागत केलं होतं. मित्र पक्ष भाजपची ताकद वाढली तरी आम्हाला आनंद आहे, अशी प्रतिक्रिया विजय चौगुले यांनी दिली होती. गणेश नाईक यांचे एकेकाळचे शिष्य असलेले चौगुले सध्या कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात.