एक्स्प्लोर
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी पहिला उमेदवारी अर्ज राष्ट्रवादीकडून

मुंबई : काँग्रेससोबत आघाडी झाली नसली, तरी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने 'आघाडी' मिळवली आहे. मुंबईतून पहिला उमेदवारी अर्ज राष्ट्रवादीनं दाखल केला आहे. मुंबईच्या वॉर्ड क्रमांक 206 मधून राष्ट्रवादीचे युवा उमेदवार नील शिवडीकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दक्षिण मध्य मुंबईतून ते निवडणूक लढवणार आहेत. नील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, तेव्हा अनेक कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप आणि मनसे हे पाचही प्रमुख पक्ष स्वबळावर लढवणार आहेत. त्यामुळे कुठे तिरंगी, तर कुठे चौरंगी लढत होण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे बाजी कोणता पक्ष मारणार, आणि महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. राष्ट्रवादीनं याद्या जाहीर करण्यातही आघाडी घेतली असून आतापर्यंत 100 हून अधिक उमेदवारांच्या 3 याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. मुंबई महापालिकेसाठी 21 फेब्रुवारीला मतदान होणार असून 23 तारखेला मतमोजणी होणार आहे.
आणखी वाचा























