शरद पवारांकडून अमोल कोल्हेंचं थेट समर्थन, औरंगजेब-रावणाचा दाखला, भाजपला म्हणाले, तुम्ही गांधीवादी कधीपासून?
अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांसह अनेकांनी निषेध व्यक्त करत टीका केलीय. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मात्र अमोल कोल्हे यांना थेट समर्थन दिलंय
Amol Kolhe : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे सध्या Why I Killed Gandhi या चित्रपटामुळे चर्चेत या चित्रपटात अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे यांची भूमिका साकारली आहे. यावरुन राष्ट्रवादीच्या नेत्यांसह अनेकांनी कोल्हे यांचा निषेध केला आहे. अशात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मात्र अमोल कोल्हे यांना थेट समर्थन दिलं आहे.
पवार यांनी आज म्हटलं की, गांधी सिनेमा सगळ्या जगात गाजला. त्या सिनेमात सुद्धा नथुराम गोडसेची भूमिका होती. नथुराम गोडसेची भूमिका केली तो कलाकार होता. कलाकार म्हणून कोल्हेंच्या या भूमिकेकडे पाहिलं पाहिजे, असं पवार म्हणाले. विशेष म्हणजे कोल्हे यांच्या या चित्रपटाचा मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त केला आहे.
दरम्यान आज यावर शरद पवार यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपटात औरंगजेबाच्या भूमिकेत जो औरंगजेबाची भूमिका करतो. त्यात तो मुघलांचा समर्थक होत नाही, किंवा राम -रावणाच्या भूमिकेत रावणाची भूमिका करणाऱ्याने सीतेचं अपहरण केलं असं होत नाही, असं ते म्हणाले.
Sharad Pawar on Amol Kolhe : शरद पवारांकडून अमोल कोल्हेंचं थेट समर्थन, औरंगजेब- रावणाचा दाखला@PawarSpeaks @kolhe_amol #amolkolhe #NathuramGodse #SharadPawar pic.twitter.com/IPVXZid2ed
— ABP माझा (@abpmajhatv) January 21, 2022
अमोल कोल्हेंनी जी भूमिका केली ती कलावंत म्हणून केली, मला माहिती आहे, अमोल कोल्हे यांनी ज्यावेळी भूमिका केली, त्यावेळी ते आमच्या पक्षातही केली, त्यांनी कलावंत म्हणून भूमिका केली म्हणजे त्यांनी गांधींविरोधात भूमिका आहे असा त्याचा अर्थ नाही. किंवा नथुराम गोडसेने जे काय काम केलं, त्याबद्दल सारा देश जाणून आहे, असं पवार म्हणाले.
भाजपकडून याबाबत होत असलेल्या टीकेवर बोलताना पवार म्हणाले की, भाजप हे गांधीवादी कधीपासून झाले? भाजपच्या संघ आणि त्यांचा इतिहास सर्वांना माहिती आहे. एक काळ असा होता की गांधींबाबत वेगळी भूमिका घेणाऱ्या ज्या शक्ती होत्या त्या शक्ती सध्या कुठे आहेत बघितलं पाहिजे, त्यावर त्यांनी बोलावं. कलावंत म्हणून मी कोणत्याही कलाकाराचा सन्मान करतो, असंही पवार म्हणाले.
संबंधित बातम्या