राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी; अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल
NCP Chief Sharad Pawar Gets Death Threat: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी, मुंबईतील सिल्व्हर ओक येथील घरी अज्ञात व्यक्तीनं फोन करुन दिली धमकी
NCP Chief Sharad Pawar Gets Death Threat: राष्ट्रवादी काँग्रेसचे (National Congress Party) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना जीवे मारण्याची धमकी आल्याची माहिती मिळत आहे. मुंबईतील (Mumbai News) सिल्व्हर ओक (Silver Oak) येथील घरी अज्ञात व्यक्तीनं फोन करुन धमकी दिल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, शरद पवार अधिवेशनासाठी दिल्लीला गेले आहेत.
शरद पवारांचा काल (सोमवारी, 12 डिसेंबर) वाढदिवस झाला. वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी पवारांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. मुंबईतील शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक येथील घरी एका अज्ञात व्यक्तिचा फोन आला. या व्यक्तीनं फोन करून पवारांना जीवे मारण्याची धमकी दिली. मुंबईत येऊन देशी बनावटीच्या पिस्तुलानं ठार मारणार असल्याचं धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तिनं फोनवर म्हटलं आहे. धमकी देणारी व्यक्ती हिंदीत बोलत होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील मलबार हिल परिसरात सिल्वर ओक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं निवासस्थान आहे. याच सिल्वर ओकवर आज (मंगळवारी) एका अज्ञात व्यक्तिचा फोन आला. फोनवर बोलणाऱ्या अज्ञात इसमानं शरद पवारांना जीवे मारणार असल्याची धमकी दिली. शरद पवारांच्या बंगल्यावर तैनात असलेल्या पोलीस ऑपरेटरच्या तक्रारीवरून गावदेवी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
शरद पवारांना धमकी देणारा सापडला, पवारांनी 2 डिसेंबरलाच दिलेली माहिती
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलं आहे. पवारांच्या निवासस्थानी फोन करुन जीवे मारण्याची धमकी देणारी व्यक्ती वेडसर असल्याची माहिती समोर आली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीचं नाव नारायण सोनी असं आहे. शरद पवारांनी 2 डिसेंबर रोजी पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं होतं. ही व्यक्ती शरद पवारांना दिवसाला किमान 100 फोन करत असल्याचा उल्लेख शरद पवार यांनी पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात केला होता.
पाहा व्हिडीओ : Sharad Pawar Gets Death Threat : शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धमकी देणाऱ्यानं देशी कट्ट्यानं ठार मारू, असं म्हटलं आहे. याप्रकरणी सिल्वर ओकवरील पोलीस ऑपरेटरनं या धमकी संदर्भात पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानंतर गांवदेवी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञाताविरोधात 294 आणि 506 (2) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी बेळगाव सीमावादावरुन (Belgaum Border) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांनी 48 तासांचा अल्टिमेटम दिला होता. 24 तासांत हल्ले थांबवा अन्यथा, पुढच्या 48 तासांत माझ्यासह महाराष्ट्रातील सर्व खासदारांना बेळगावच्या नागरिकांना धीर देण्यासाठी जावं लागेल, असा इशारा पवारांनी दिला होता. त्यावेळी पवारांचं वक्तव्य चर्चेत आलं होतं.