Nawab Malik : 'ती' पॉवर ऑफ एटर्नी बोगस, असा व्यवहार थेट दहशतवादाला रसद; नवाब मलिकांच्या जामिनाला ईडीचा विरोध
Nawab Malik : नवाब मलिक दावा करत असलेली पॉवर ऑफ एटर्नी बोगस असल्याचा दावा करत ईडीने मलिकांच्या जामीन अर्जाला विरोध केला आहे.
Nawab Malik : नवाब मलिक दावा करत असलेली पॉवर ऑफ एटर्नी ही बनावट असल्याचे ईडीने कोर्टात सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या जामीन अर्जाला ईडीने विरोध केला आहे. हसिना पारकरच्या पुढाकाराने झालेला व्यवहार म्हणजे दहशतवादाला रसद असल्याचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी पीएमएलए कोर्टाला सांगितले. नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी झाली. त्यावेळी ईडीने जोरदार विरोध केला.
अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी पीएमएलए कोर्टाला सांगितले की, नवाब मलिक यांनी न्यायालयासमोर ज्या पॉवर ऑफ एटर्नीचा उल्लेख केला आहे, त्यावर मुनिरा प्लम्बरने कधी सही केलीच नव्हती. त्यामुळे ती पॉवर ऑफ एटर्नी ही बोगस आहे. नवाब मलिक यांचे कनेक्शन 'डी-कंपनी'सोबत होते. मुंबईत 'डी-कंपनी'चे सारे कारभार दाऊदची बहीण हसीना पारकर पाहत होती. त्यामुळे तिच्याच देखरेखी खाली कुर्ल्यातील गोवावाला कंपाऊंडचा हा व्यवहार झाला होता. त्यामुळे हे प्रकरण दहशतवादी संघटनेला एक प्रकारे थेट टेरर फंडिंग करणारे असल्याचा युक्तिवाद अॅड. सिंह यांनी करत नवाब मलिक यांना जामीन देण्यात येऊ नये अशी मागणी केली. ईडीच्यावतीने युक्तिवाद संपला असून आता पुढील सुनावणी 19 सप्टेंबर रोजी होणार आहे. या सुनावणीत मलिक यांचे वकील अमित देसाई जामिनासाठी युक्तिवाद करणार आहेत.
काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना ईडीने अटक केली होती. दहशतवादी कारवायांना होणाऱ्या आर्थिक मदतीच्या अनुषंगांनी केंद्रीय तपास यंत्रणांचा तपास सुरू आहे. यामध्ये नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मदतीने व्यवहार केला असल्याचा आरोप आहे.
नवाब मलिकांची नेमकी भूमिका काय?
नवाब मलिकांनी शहावली खानच्या साथीनं गोवावाला कंपाऊंडमधील बेकायदेशीर भाडेकरूंचा सर्व्हे करून घेतला. त्यामुळे तिथल्या अनियमिततेची त्यांना पूर्ण कल्पना होती. त्यासाठी मलिकांनी सरदार खानसह हसीना पारकरसोबत मलिकांनी अनेकदा बैठकाही केल्या. सरदार खानचा भाऊ मुनिरा प्लंबरसाठी तिथं भाडं वसुलीचं काम करायचा. सरदार खाननं ईडीला दिलेल्या माहितीनुसार नवाब मलिकांनी गोवावाला कंपाऊंडमध्ये बेकायदेशीरपणे 'कुर्ला जनरल स्टोअर्स' या नावानं एक गाळा अडवून ठेवला होता. ज्याची मालकी त्यांचा भाऊ अस्लम मलिकच्या नावे होती. 1992 नंतर ते दुकान बंद करण्यात आलं. 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपी सरदार शहावला खान हा औरंगाबाद जेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना जेव्हा जेव्हा पैरोलवर बाहेर यायचा तेव्हा तेव्हा नवाब मलिक, अस्लम मलिक, हसीना पारकर, सरदार खान यांच्यात बैठका व्हायच्या. गोवावाला कंपाऊंडचा जास्तीत जास्त भाग गिळंकृत करण्यासाठीचा सर्व्हेयरच्या मदतीनं मलिकांनी तिथं बेकायदेशीर भाडेकरू घुसवले. तपासयंत्रणेला साल 2005 मधील मिळालेल्या कागदपत्रांवरून हे सिद्ध होत असल्याचा दावा मलिकांविरोधातील आरोपपत्रात करण्यात आला आहे. हसिना पारकरचा मुलगा आलिशाननेदेखील दाऊदचा व्यवहार हसिना पारकर 2014 पर्यंत सांभाळत असल्याची कबुली दिली.