नवी मुंबई मेट्रोला 12 वर्षांचा विलंब, कंत्राटदाराकडून एकाही पैशाचा दंड वसूल नाही, खर्चात मात्र 291 कोटींची वाढ
Navi Mumbai Metro : नवी मुंबई मेट्रोस विलंब होऊनही कंत्राटदारावर सिडकोने आतापर्यंत एकही पैशाचाही दंड आकारला नसल्याचं समोर आलं आहे. नवीन खर्चात 291 कोटींची प्राथमिक वाढ झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
नवी मुंबई : नवी मुंबई मेट्रोस 12 वर्षांचा विलंब होऊनही कंत्राटदाराकडून सिडकोने आतापर्यंत एकही पैशाचाही दंड आकारला नसल्याचं समोर आलं आहे. या मेट्रोसाठीच्या खर्चात मात्र 291 कोटींची प्राथमिक वाढ झाल्याची माहिती आहे.
1 मे 2011 रोजी नवी मुंबई मेट्रोचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले होते. आज 12 वर्ष उलटूनही नवी मुंबई मेट्रो सेवा सुरु झाली नाही. या कामात विलंब होऊनही कंत्राटदारावर कोठल्याही प्रकारचा दंड न आकारल्याचा धक्कादायक माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस सिडको प्रशासनाने दिलेल्या माहितीतून समोर आली आहे. विशेष म्हणजे मेट्रो कामाच्या खर्चात 291 कोटींची प्राथमिक वाढ झाल्याची माहिती कागदपत्रांवरून लक्षात येते.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सिडको प्रशासनाकडे नवी मुंबई मेट्रो संबंधित विविध माहिती 16 फेब्रुवारी 2023 रोजी मागितली होती. सिडको प्रशासनाने 26 एप्रिल 2023 रोजी पाठविलेल्या उत्तरात जी माहिती दिली आहे त्या अनुषंगाने कामाच्या विलंबाची विविध कारणे आहेत. सिडको नवी मुंबई मेट्रो मार्गिका क्रमांक 1 अंतर्गत येणाऱ्या बेलापूर ते पेंधर हा मार्ग 11.10 किलोमीटर असून एकूण 11 मेट्रो स्थानके आहेत.
कंत्राटदाराकडून दंड आकारला नाही
सिडको नवी मुंबई मेट्रो मार्गिका क्रमांक 1 चा अपेक्षित खर्च 3063.63 कोटी होता. जी कागदपत्रे दिली आहेत त्या अनुषंगाने एकूण रक्कम 3354 कोटी होत आहे. यापैकी 2311 कोटी दिले असून शिल्लक रक्कम 1043 कोटी देणे आहे. सिडको प्रशासनाने विलंब करणाऱ्या एकाही कंत्राटदाराला दंड आकारला नाही ना काळया यादीत टाकण्याचे धाडस दाखविले.
मेट्रो उद्घाटन एप्रिल फुलच्या मार्गावर
बेलापूर ते पेंथर पर्यंत असलेली मेट्रो मार्गिका केव्हा सुरु होईल याबाबत कमालीची गुप्तता बाळगली जात आहे. मेट्रो स्टेशन 7 ते 11 मधील सर्व कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित स्टेशन 1 ते 6 चे काम पूर्ण करून पूर्ण मार्ग एप्रिल 2023 पर्यंत प्रवाश्यांकरिता सुरु करण्याचे लक्ष्य ठेवलेले असल्याचे सिडको प्रशासन सांगत आहेत. अप्रत्यक्ष सिडको प्रशासन मेट्रो उद्घाटन करण्याच्या अनुषंगाने नागरिकांना एप्रिल फुलच्या करण्याच्या मार्गावर आहे. महिना दिला आहे पण तारीख देत नाही.
कंत्राटदार मेसर्स सजोस, महावीर, सुप्रीम या कंत्राटदारांच्या आर्थिक कमकुवत स्थितीमुळे काम पुर्ण करण्यास असमर्थ ठरल्यामुळे दोन्ही कंत्राट 1 फेब्रुवारी 2017 रोजी रद्दबातल करण्यात आले. त्यानंतर सिडकोने स्थानक 1 ते 6 चे उर्वरित काम मेसर्स प्रकाश कॉस्ट्रोवेल, स्थानक 7 ते 8 मेसर्स बिल्ट राईट, स्थानक 9 व 11 चे काम मेसर्स युनीवास्तू आणि स्थानक 10 चे काम मेसर्स जे कुमार यांस देण्यात आले.
अश्या प्रकल्पात अभ्यास करुन योग्य नियोजन न झाल्याचा फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्या कंत्राटदारांनी सिडकोची फसवणुक केली आहे त्यांस काळया यादीत टाकत दंड आकारण्याची मागणी गलगली यांनी केली आहे.