(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Vaccination : मुंबईत आज लसीकरण बंद! पुरेशा लस साठ्याअभावी लसीकरणाला पुन्हा ब्रेक
Mumbai Vaccination : मुंबईतील लसीकरण मोहीमेला पुन्हा एकदा ब्रेक लागला आहे. पुरेशा लससाठ्या अभावी लसीकरण मोहीमेत अडथळे येत आहेत.
Mumbai Vaccination : देशासह राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावात घट होताना दिसत आहे. अशातच तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातील अनेक राज्यांमध्ये उपाययोजना केल्या जात आहेत. अशातच देशभरात लसीकरण मोहीमेनं वेग धरला आहे. परंतु, पुरेशा लसींच्या साठ्याअभावी लसीकरण मोहीमेत अडथळे येत आहेत. देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतही पुरेशा साठ्याअभावी लसीकरण मोहीमेमध्ये अनेक अडथळे येत असल्याचं पाहायला मिळत आहे. काल (मंगळवारी) दिनांक 20 जुलै, 2021 रोजी पुरेशा लससाठ्या अभावी मुंबईतील काही लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आली होती. तर आज मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर लसीकरण बंद असणार आहे.
कोविड-19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर आज (बुधवार) दिनांक 21 जुलै 2021 रोजी लसीकरण बंद राहणार आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या वतीनं देण्यात आली आहे. तसेच लसींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्या अनुरूप योग्य निर्णय घेवून मुंबईकर नागरिकांना सातत्याने अवगत करण्यात येते. लस साठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरु करण्यात येईल. मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असं आवाहनही मुंबई महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे.
जुलैच्या तीन आठवड्यांमध्ये मुंबईतील लसीकरण केंद्रे बंद ठेवण्याची ही तिसरी वेळ आहे. महापालिकेला गेल्या आठवड्यातील शुक्रवारी लसींचा साठा मिळाला होता. परंतु, मुसळधार पावसामुळे शनिवारी लसीकरण कमी झालं होतं. तसेच रविवारी आठवडा सुट्टी असल्यामुळे लसींचा उरलेला साठा सोमवारी आणि काही प्रमाणात मंगळवारी वापरण्यात आला. त्यानंतरचा साठा मंगळवारी येणं अपेक्षित होतं. मात्र तो साठा प्राप्त न झाल्यामुळे पुन्हा एकदा लसीकरण बंद ठेवण्याची नामुश्की मुंबई महापालिकेवर ओढवली आहे.
देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असून काही प्रमाणात घट झाल्याचं पाहायला मिळतं. हे जरी खरं असलं तरी कोरोनापासून बचावासाठी सध्या एकमेव मार्ग म्हणजे लसीकरण, असं तज्ज्ञांच्या वतीनंही वारंवार सांगितलं जात आहे. 16 जानेवारीपासून देशभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. अशातच मुंबईतही 16 जूनपासून लसीकरणाला सुरुवात झाली होती. आतापर्यंत मुंबईकरांनी लसीकरणारा सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या आठवड्यात केंद्र सरकारकडून लसींचा पुरेसा साठा उपलब्ध न झाल्यामुळे मुंबईतील लसीकरण मोहीम काही प्रमाणात मंदावल्याचं पाहायला मिळत आहे.
मुंबईत गेल्या 24 तासात 351 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना नियंत्रणात असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 351 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 525 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,07,654 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 7,012 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1063 दिवसांवर गेला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :