पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा, पुढील सुनावणी 25 मार्चला
WB CM Mamta Banerjee : ममता दिदिंनी नुकत्याच झालेल्या मुंबई दौ-यात राष्ट्रगीताचा अवमान केल्याचं प्रकरण, याप्रकरणी भाजप कार्यकर्त्याकडनं ममता बॅनर्जींविरोधात तक्रार दाखल

WB CM Mamta Banerjee : पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मुंबई सत्र न्यायालयानं दिलासा दिला आहे. मुंबईतील माझगाव दंडाधिकारी न्यायालयानं कोर्टात हजर राहण्यासाठी बजावलेल्या समन्ससह याप्रकरणातील सुनावणीला स्थगिती दिली आहे. राष्ट्रगीताचा अनादर केल्याचा दावा करत मुंबईतील एका भाजप कार्यकर्त्यानं केलेल्या फौजदारी तक्रारीची दखल घेत दंडाधिकारी कोर्टानं 2 मार्चला ममता बॅनर्जी यांना कोर्टापुढे हजर राहण्याचे निर्देश दिले होते. या समन्सला ममता बॅनर्जी यांनी जेष्ठ कायदेतज्ञ माजिद मेमन यांच्या माध्यमातून मुंबई सत्र न्यायालयात आव्हान दिलं आहे. विशेष कोर्टाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी या याचिकेची दखल घेत याप्रकरणातील कारवाईला स्थगिती देत याचिकेची सुनावणी 25 मार्चपर्यंत स्थगित केली आहे.
मुंबईतील कफ परेड येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात 1 डिसेंबर 2021 रोजी पार पडलेल्या शासकीय कार्यक्रमाच्या शेवटी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बसूनच राष्ट्रगीत बोलण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्या उभे राहून पुढे राष्ट्रगीताच्या दोन ओळी म्हणून कार्यक्रमातून निघून गेल्या. ही क्लिप सोशल मीडियावर पाहिल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे (भाजप) मुंबई सचिव विवेकानंद गुप्ता यांनी कफ परेड पोलीस ठाणयात याबाबत तक्रार दाखल केली. परंतु पोलिसांनी त्यावर कोणतिही कारवाई न केल्यानं त्यांनी शिवडी येथील माझगाव दंडाधिकारी न्यायालयात याबाबत तक्रार दाखल केली. ममता बॅनर्जींचे कृत्य म्हणजे राष्ट्रगीताचा अवमान आणि अनादर असून साल 1971 च्या राष्ट्रीय सन्मानाच्या अवमान प्रतिबंधक कायद्यानुसार त्या शिक्षेस पात्र असल्याचा दावा गुप्ता यांनी केला. त्यावर माझगाव कोर्टातील दंडाधिकारी पी. आय. मोकाशी यांच्यासमोर सुनावणी पार पडली होती.
तक्रारदारांनी या प्रकरणी डिव्हीडी, व्हिडिओ क्लिप, यृट्यूबवरील लिंक न्यायालयात पुरावे म्हणून सादर केलेत. केलेल्या तक्रारीची पडताळणी करताना प्रथमदर्शनी असे आढळून येते की, आरोपी (ममता बॅनर्जी) यांनी कार्यक्रमादरम्यान, राष्ट्रगीत गायलं मात्र मध्येच त्या अचानक थांबल्या आणि त्यांनी व्यासपीठ सोडल्याचं स्पष्ट दिसत आहे. तसेच जरी त्या न्यायालयाच्या अधिकारक्षेत्राच्या बाहेर असल्या तरीही फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 202 अंतर्गत पोलिसांनी बॅनर्जींविरोधात कारवाई प्रक्रिया पुढे ढकल्याचं कोणतेही कारण आढळून येत नाही. बॅनर्जी या राष्ट्रीय अवमान प्रतिबंधक कायद्याच्या कलम 3 अन्वये शिक्षेस पात्र असल्याचं दंडाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात नमूद करत त्यांना 2 मार्च रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीला हजर राहण्याचे समन्स बजावलं होतं, ज्याला शुक्रवारी मुंबई सत्र न्यायालयानं स्थगिती दिली आहे.























