Sachin Waze: मनी लॉंड्रिंग प्रकरणात सचिन वाझेला जामीन मंजूर, पण इतर प्रकरणामुळे मुक्काम तुरुंगातच
Money Laundering: सचिन वाझेला जामीन मिळूनसुद्धा इतर प्रकरणात न्यायालयीन कोठडी असल्यानं वाझे याचा मुक्काम तुरुंगातच राहणार आहे.
मुंबई: बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेला (Sachin Waze) मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा दिला असून ईडीच्या मनी लॉन्ड्रीग प्रकरणात (Money Laundering) त्याला जामीन मंजूर झाला आहे. सचिन वाझेने सीआरपीसी कलम 88 अंतर्गत जामीनाचा अर्ज दाखल केला होता. त्याच्या जामीन अर्जाला ईडीनं विरोध दर्शवला होता. ईडीच्या प्रकरणात सचिन वाझेला जामीन मिळाला असला तरी इतर प्रकरणात त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली असल्याने वाझेाचा मुक्काम सध्यातरी तुरुंगातच राहणार आहे.
सचिन वाझेला जामीन दिल्यास तो पुराव्याशी छेडछाड करु शकतो असं सांगत ईडीने त्याच्या जामीनाला विरोध केला होता. या प्रकरणामध्ये दोन्ही बाजूंचा युक्तीवाद 15 नोव्हेंबर रोजी पूर्ण झाला होता. वाझेच्या विरोधात ईडी, सीबीआय आणि एनआयए प्रकरण प्रलंबित आहे.
सचिन वाझे माफीचा साक्षीदार
बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याला कथित भ्रष्टाचार प्रकरणात माफीचा साक्षीदार करण्यात आलं आहे. या कथित भ्रष्टाचार प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह अन्य आरोपींविरोधात आपल्याकडे असलेली माहिती देण्याची तयारी सचिन वाझेंनी दाखवली आहे.
आधी NIA कडून अटक, मग सीबीआयकडून बेड्या
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात आल्याच्या तसेच त्या गाडीचा मालक मनसूख हिरेनच्या अचानक मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझे, त्यांचा सहकारी रियाझ काझी आणि पोलीस निरिक्षक सुनील मानेंला एनआयएकडून प्रथम अटक करण्यात आली होती. तर दुसरीकडे ईडीने सचिन वाझे, अनिल देशमुख आणि इतरांविरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. सीबीआयने भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सचिन वाझे, अनिल देशमुख आणि इतर दोघांना अटक केली होती. आपण अनिल देशमुख यांच्या आदेशानुसार मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटकडून पैसे गोळा केल्याचं सचिन वाझेने तपासादरम्यान सांगितलं होतं.
सचिन वाझे सध्या उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याबाहेर सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी आणि व्यावसायिक मनसुख हिरेन याच्या हत्येप्रकरणी अटकेत आहे. या बरोबरच भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहार आणि ख्वाजा युनुस कथिक कोठडी मृत्यू प्रकरणातही वाझे आरोपी आहे.
ही बातमी वाचा: