Mumbai Rain news: मुंबईकरांनो घराबाहेर पडण्यापूर्वी सावधान! हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट, अतिमुसळधार पावसाचा इशारा
मुंबईत मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाने हजेरी लावल्याने मध्य रेल्वेची वाहतूक सध्या विस्कळीत झाली आहे.

Weather Update: राज्यात पावसाने पुन्हा एकदा जोर धरला असून हवामान खात्याने मुंबईसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मध्य प्रदेशमध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अरबी समुद्र उसळला आहे. यामुळे कोकण, मुंबई उपनगरासह मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्या प्रमुखांनी दिली. मुंबईसह ठाणे, रत्नागिरी अशा जिल्ह्यांना पावसाचे तीव्र अलर्ट देण्यात आले आहेत.
मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट
आज, सोमवार 15 जुलै रोजी मुंबईत सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून काही भागांमध्ये जोरदार सरी सुरू आहेत. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही तासांत शहरात काही भागांत अतिमुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. वाऱ्यांचाही वेग जास्त असण्याचा इशारा देण्यात आला असून समुद्रकिनारी राहणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. पश्चिम उपनगरात मागील दीड ते दोन तासापासून सुरू असलेला मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली गेला आहे. अंधेरी सबवे खाली तीन ते चार फूट पाणी भरल्यामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मुंबईत मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाने हजेरी लावल्याने मध्य रेल्वेची वाहतूक सध्या विस्कळीत झाली आहे.
कोकणातील इतर जिल्ह्यांनाही इशारा
मुंबईसोबतच ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी देखील आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीसह काही घाटमाथ्यांवरही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः रायगड आणि रत्नागिरीतील काही भागांमध्ये नद्या दुथडी भरून वाहण्याची शक्यता असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.
पुणे-साताऱ्यात घाटमाथ्यावर पावसाचा जोर
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुणे आणि साताऱ्यातील घाटमाथा परिसरात – विशेषतः ताम्हिणी, भोर, महाबळेश्वर, खंडाळा, आणि इतर डोंगराळ भागांत – अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या भागात दरड कोसळण्याचा आणि रस्ते बंद होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

























