(Source: ECI/ABP News/ABP Majha)
धक्कादायक! ट्रेन आली, मात्र फाटक उघडे ठेवून गेटमन झोपला, दिवा वसई मार्गावरील प्रकार
Mumbai Railway News : रेल्वे फाटक चालू बंद करण्यासाठी नेमण्यात आलेला कर्मचारी फाटक उघडेच ठेवून झोपल्याची घटना समोर आलीय. ही घटना दिवा वसई रेल्वे मार्गावरील डोंबिवली मोठागाव रेल्वे फाटकात घडली आहे.
मुंबई : दिवा-वसई मार्गावरील डोंबिवली (Dombivli) मोठागाव येथे एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. रात्रीच्या वेळी फाटक उघडझाप करणारा गेटमन रेल्वे फाटक उघडे ठेवून चक्क केबिनचा दरवाजा आतून बंद करून झोपल्याचे उघड झाले आहे. हा सर्व प्रकार स्थानिक नागरिकांनी मोबाईलमध्ये कैद केला आहे. गेटमनच्या बेजबाबदारपणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
रेल्वे फाटक चालू बंद करण्यासाठी रेल्वेचे अधिकृत कर्मचारी नेमलेले असतात. या कर्मचाऱ्याच्या हातात हजारो नागरिकांचे प्राण असतात. मात्र अशाच कर्मचाऱ्याकडून जर आपल्या कर्तव्यात कसूर झाली तर मोठी दुर्घटना घडू शकते. अशीच घटना दिवा वसई रेल्वे मार्गावरील डोंबिवली मोठागाव रेल्वे फाटकात घडली आहे. रात्रीच्या सुमारास फाटक उघडझाप करणारा गेटमन रेल्वे फाटक उघडे ठेवून चक्क केबिनचा दरवाजा आतून बंद करून झोपल्याची बाब स्थानिक नागरिकांनी मोबाईलमध्ये कैद केली आहे. स्थानिक नागरिकांनी केबिनचा दरवाजा ठोकून गेटमनला उठवत रेल्वे आल्याची माहिती देताच गडबडलेल्या या गेटमनने प्रथम फाटक बंद केले. मात्र, हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. युवा सेना पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांनी देखील ट्विट करून रेल्वे कर्मचाऱ्याच्या या निष्काळजपणाबाबत कारवाई करण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान या प्रकरणी रेल्वेचे फाटक सुरक्षित असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आलीय. शिवाय अशा प्रकारे गेटमन ड्युटीच्या काळात झोपल्याची बाब गंभीर असून या घटनेची चौकशी करून दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
डोंबिवली मोठागाव या वेगाने वाढणाऱ्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असून या नागरिकांना दिवा वसई मार्गावरील मोठागाव रेल्वे फाटकातून रात्री अपरात्री ये जा करावी लागते. हे फाटक बंद करण्यासाठी याठिकाणी एमएमआरडीएच्या माध्यमातून उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आले आहेत. मात्र तूर्तास तरी तरी फाटकातून नागरिकांना ये जा करणे हाच पर्याय आहे. या फाटकाची उघडझाप करण्यासाठी 24 तास गेटमन नेमण्यात आला आहे. मात्र मंगळवारी रात्रीच्या सुमारास फाटक उघडे ठेऊन हा गेटमन केबिनचा दरवाजा बंद करून झोपला होता.
@Central_Railway @RailMinIndia dangerous situation at Diva-Vasai Gate NO1 railway crossing at Mothagaon night 2am railway authority should take strict action. pic.twitter.com/CkYVQiT8ce
— Dipesh Pundlik Mhatre (@Dipesh99Mhatre) January 4, 2023
या मार्गावरून रात्रीच्या वेळी धावणारी रेल्वे येत असताना आजूबाजूच्या नागरिकांना गाडीचा हॉर्न ऐकू आल्याने नेहमीप्रमाणे नागरिकांनी फाटक ओलांडणे थांबवले. मात्र, बराच वेळ फाटक बंद होत नसल्याने ते पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांनी केबिनकडे धाव घेतली. यावेळी केबिनमध्ये गेटमन चक्क झोपल्याचे आढळून आले. गेटमन झोपला असल्याचा व्हिडीओ नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद करत गेटमनला गाडी आल्याची वर्दी देताच त्याने तात्काळ गेट बंद करत रेल्वेला मार्ग मोकळा करून दिला. मात्र अशा प्रकारे नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या कर्मचाऱ्यावर तात्काळ कारवाई केली जावी अशी मागणी दीपेश म्हात्रे यांनी केली असून याप्रकरणी त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे ट्वीटद्वारे तक्रार केली आहे.
रेल्वे प्रशासनाकडून व्हिडीओ कधीचा आहे त्याची सत्यता पडताळन्याचे काम सुरू आहे. मात्र प्रथम दर्शनी हा व्हिडीओ पाहता ही परिस्थिती धोकादायक दिसत नाही. कारण यात ट्रेन फाटकापासून ठराविक अंतरावर थांबलेली दिसत आहे. जेव्हा फाटक उघडे असते त्यावेळी सिग्नल लाल असतो. त्यामुळे लाल सिग्नलला ट्रेन फाटक ओलांडू शकत नाही. जेव्हा फाटक बंद केले जाते तेव्हा हा सिग्नल हिरव्या रंगात परावर्तित होतो आणि ट्रेन मार्गस्थ होते. सध्य स्थितीत सिग्नल लाल असल्याने ट्रेन थांबलेली दिसत असल्याचे सांगत या प्रकरणी चौकशी करत कारवाई करण्यात येईल असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.