Mumbai Pune Journey: मुंबई-पुणे प्रवास अवघ्या 90 मिनिटांत होणार पूर्ण, सकाळी चहा घेतल्यावर नाश्त्यापर्यंत पुण्यात पोहोचाल, नितीन गडकरींचा मास्टरप्लॅन
Pune-Mumbai: आता मुंबई पुणे अंतर अगदी ९० मिनिटांत पार करता येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई: पुणे-मुंबई (Mumbai Pune journey) असा प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई पुणे प्रवासाला जवळपास अडीच ते तीन तास लागतात. जाताना घाटामध्ये जर ट्रॅफिक लागलं तर मग तेच अंतर पार करायला चार ते पाच तासही कमी पडतात. मात्र आता मुंबई पुणे (Mumbai Pune journey) अंतर अगदी ९० मिनिटांत पार करता येणार असल्याची माहिती समोर आली आहे. आता मुंबई पुणे सुपरफास्ट प्रवास होणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी शनिवारी विधानभवन परिसरामध्ये मोठी घोषणा केली आहे. येत्या वर्षभरात राज्यात दीड लाख कोटी रुपयांची विकासकामे मंजूर झाली असून, त्यातील तब्बल ५० हजार कोटी रुपयांची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात येणार आहेत, अशी माहिती गडकरी यांनी दिली आहे.
या विकासकामांमध्ये पुणे आणि मुंबईकरांचे आयुष्य अधिक वेगवान बनवणाऱ्या अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश असणार आहे. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी पुणे-मुंबई आणि पुढे दक्षिणेकडे जाणाऱ्या प्रवासाला नवी दिशा देणारा महत्त्वपूर्ण प्रकल्प यावेळी जाहीर केला. पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेला जोडून एक सामायिक एक्सप्रेस हायवे तयार करण्यात येत आहे. हा ग्रीनफिल्ड लिंक अटल सेतू ते जेएनपीटी चौक ते पुणे-शिवार जंक्शन असा १३० किलोमीटरचा असणार आहे.
फक्त पुणे जिल्ह्यासाठी गडकरींच्या मंत्रालयांतर्गत सुमारे ५० हजार कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत, जी येत्या तीन महिन्यांत सुरू होतील, असा दावा त्यांनी केला. यामध्ये अनेक महत्त्वाच्या एलिव्हेटेड प्रकल्पांचा समावेश आहे तळेगाव-चाकण-शिक्रापूर हा ४ हजार २०७ कोटींचा चार स्तरावरील महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. यात खाली रस्ता, त्यावर दोन उड्डाणपूल आणि सर्वात वर मेट्रो मार्ग असेल. याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. हडपसर ते यवत ५ हजार २६२ कोटींचा हा प्रकल्प एलिव्हेटेड स्वरूपाचा असणार आहे, अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे.
Mumbai Pune journey: निवडणूक आटोपल्या की भूमिपूजन होईल
काल (शनिवारी, ता १३) बोलताना नितीन गडकरींनी सांगितलं की, निवडणूक आटोपल्या की भूमिपूजन होईल. याशिवाय हडपसर ते यवत महामार्गाचा एमओयु झाला आहे. याचंही निवडणुकीनंतर भूमिपूजन होईल. एनएचएआयकडून पुणे (खेड) ते नाशिक फाटा असा महामार्ग होईल. 93% जमीन अधिग्रहण झाला आहे, नाशिक ते आळंदी आणि आळंदी ते खेड असे दोन टप्प्यात काम होईल. नागपूर ते काटोल सेक्शन, काटोल बायपास अशा रस्त्यांवर ही काम चालू आहे. वार्षिक योजनेत जवळपास 60000 कोटींच्या कामांना मंजुरी दिली आहे, त्यापैकी 20,000 कोटींची काम अप्रूव्हलच्या स्टेजवर आहे.महाराष्ट्रात एकूण सव्वा लाख कोटींची काम केली जाणार आहे. येणाऱ्या वर्षात दीड लाख कोटींची काम महाराष्ट्रात केले जाईल. त्यापैकी पन्नास हजार कोटींचे काम एकट्या पुणे आणि जवळपासच्या भागात होणार आहे.





















