(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Pune Expressway : आज मुंबई-पुणे प्रवास करताय? पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर आज सहा तासांचा जम्बो ब्लॉक; वाहतुकीला पर्याय कोणता?
मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज पुन्हा एकदा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान सर्व प्रकारची वाहने (हलकी व जड अवजड वाहने) यांची वाहतूक बंद करण्यात येणार आहे.
पुणे: मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवरुन (Mumbai - Pune Expressway) जर तुम्ही प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आज सहा तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. पनवेल-कर्जत दुहेरी मार्ग उपनगरीय रेल्वे कॉरिडोरचे काम करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. आज (9 नोव्हेंबर) सकाळी 11 ते संध्याकाळी 5 दरम्यान मुंबईकडे येणार वाहतूक बंद करण्यात येणार आहे.
मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज पुन्हा एकदा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान सर्व प्रकारची वाहने (हलकी व जड अवजड वाहने) यांची वाहतूक बंद करण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरून पुण्याच्या बाजूने मुंबईकडे येणारी वाहने पनवेल एक्झिटवरून मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 या मार्गावर करंजाडे मार्गे कळंबोली अशी वळवण्यात येणार आहे. पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येणारी वाहने शेडुंग फाट्यावरून बोर्ले टोल नाक्याकडे न येता सरळ पनवेलच्या दिशेने मार्गस्थ करण्यात आली. मुंबईकडे येणारी हलकी वाहने खोपोली एक्झि वरून वळवून मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 या मार्गावरून मार्गस्थ करण्यात येतील.
याआधी देखील घेण्यात आला होता ब्लॉक
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ब्लॉक घेण्यात आला होता. एक्स्प्रेस वेवर मोठे दिशादर्शक फलक बसवण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात आला. त्यामुळे या काळामध्ये मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक ही पूर्णपणे ठप्प झाली होती. या ब्लॉक दरम्यान न आयटीएमएस प्रणालीच्या अनुषंगाने ओव्हरहेड गॅन्ट्री बसवण्यात येत आहेत. याच गॅन्ट्रीवर सीसीटीव्ही कॅमेरे तैनात केले जाणार आहेत.
ITMS प्रकल्प राबवण्यात येणार
अपघात आणि अपघाताची संख्या पाहता इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. 340 कोटींचा हा प्रकल्प असेल. यातील 115 कोटी उभारणीसाठी तर उर्वरित 225 कोटी हे पुढील दहा वर्षाच्या देखभालीसाठी कंत्राटदाराला दिले जाणारे आहेत.
ITMS सिस्टिम काय आहे?
आयटीएमएस म्हणजे इंटिलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेन्ट सिस्टिम होय. या सिस्टिमद्वारे वाहतुकीचं नियंत्रण सॅटेलाईटद्वारे होईल. या प्रणालीमध्ये ड्रोनचाही वापर केला जाणार आहे. महामार्गावर प्रवेश करणाऱ्या प्रत्येक गाडीचा रेकॉर्ड ठेवण्यात येणार आहे. प्रवास पूर्ण होईपर्यंत त्या गाडीवर नजर ठेवली जाणार आहे. अपघात झाल्यास गाडीपर्यंत तातडीने मदत पोहोचेल. संपूर्ण रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं जाळं असेल. हे कॅमेरे लेन कटिंग करणाऱ्या वाहनांच्या नोंदी ठेवतील. वाहनं टेक्नॉलॉजीशी कनेक्ट असणं गरजेचं आहे. यासाठी व्हेईकल डिटेक्शन सेन्सर गरजेचं असेल, म्हणजेच वाहनात जीपीएससारखे सेन्सर लावले जातील. ब्लुटूथ आणि वाय-फायचा यासाठी मोठ्या प्रमाणात वापर होईल, जे हल्लीच्या वाहनात इन बिल्ड असतातच. सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे अपघात आणि वाहतूक कोंडीवर नजर ठेवली जाईल. अशावेळी द्रुतगती मार्गावरुन धावणाऱ्या वाहनांना सेन्सरद्वारे अपघात अथवा वाहतूक कोंडीची माहिती पोहोचेल, संभाव्य धोका पाहता ते वाहनावर आधीच नियंत्रण आणू शकतात. अवजड वाहनं द्रुतगती मार्गावर पार्क असतील तर त्याचीही कल्पना सेन्सरमुळे मिळेल. अपघातानंतर घटनास्थळ क्षणार्धात लक्षात येईल आणि तातडीची मदतही पोहोचेल.