Sunday Streets : आज मुंबईकरांना 'संडेस्ट्रीट्स'; चार तास तणावमुक्तीसाठी, मुंबई पोलिसांचा पुढाकार
Mumbai police Sunday Streets : मुंबईकरांना तणावमुक्त करण्यासाठी मुंबई पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दहा या वेळेत 'संडेस्ट्रीट' होणार आहे.
Mumbai police Sunday Streets : आज मुंबईतील काही रस्त्यांवर मुंबईकरांना मुंबई पोलिसांकडून एक चांगली ट्रीट मिळणार आहे. संडे स्ट्रीट्स ही संकल्पना आजच्या रविवारपासून सुरु होतेय. मुंबईकरांना तणावमुक्त करण्यासाठी मुंबई पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. मुंबईकरांना रस्त्यावर येऊन मनोरंजन, योगा, स्केटिंग, सायकलिंग तसेच सांस्कृतिक खेळ यासारखे कार्यक्रम करता यावेत यासाठी 'संडे स्ट्रीट्स' ही संकल्पना मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे आणि मुंबई महापालिका यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येणार आहे.
प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दहा या वेळेत 'संडेस्ट्रीट'ला सुरुवात होणार आहे. यावेळी काही ठिकाणी एकेरी आणि काही ठिकाणी पूर्णत: रस्ता वाहतुकीसाठी बंद करुन पोलीस लोकांना त्यांचे हे खेळ आणि कार्यक्रमासाठी रस्ते उपलब्ध करुन देणार आहेत. याबाबत पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली होती. आजच्या या संडे स्ट्रीट्ससाठी मुंबईसह नवी मुंबई आणि जवळच्या परिसरातील नागरिक देखील सहभागी होण्यासाठी निघाले असल्याचं दिसून आलं.
या कार्यक्रमासाठी यायचं असल्यास हे नियम पाळा
- व्यावसायिक जाहिरात करु नये
- मद्यपान, धुम्रपान करु नये
- राजकीय व धार्मिक उपक्रम करु नये
- कचरा करु नये
- ध्वनिक्षेपक वापरु नये
- कोविड संबंधित सूचनांचं पालन करा
- कार्यक्रम स्थळी येण्यासाठी शक्यतो सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा
Marathi too. I am soon downloading Marathi font myself. pic.twitter.com/kOwQ35INjz
— Sanjay Pandey (@sanjayp_1) March 25, 2022
'संडेस्ट्रीट'साठी या रस्त्यांची निवड
1. मरिन ड्राईव्ह - दोराभाई टाटा रोड, नरिमन पॉईंट - मुरली देवरा चौकापासून ते एनसीपीएपर्यंत - 1.7 किमी
2. वांद्रे - कार्टर रोड - ओटर्स क्लबपासून ते सीसीडीपर्यंत - 2 किमी लांब, 30 मीटर रुंद
3. गोरेगाव - माईंट स्पेसमागील रस्ता - इलेक्ट्रिक पोल क्र चीसीयू 085/018 जिम्मी योगीराज मार्गाजवळ - 500 मीटर लांब, 60 फूट रुंद
4. दा नौ नगर - लोखंडवाला मार्ग - समर्थनगर म्हाडा टॉवर्स ते जॉगर्स पार्क - 600 मीटर लांब 30 फूट रुंद
5. मुलुंड - तानसा पाईपलाईन - मुलुंड गोरेगाव लिंक रोड, तानसा पाईपलाईन ते विना नगर - 2.5 किमी लांब, 4 मीटर रुंद
6. विक्रोळी - इस्टर्न एक्स्प्रेस हायवे, विक्रोळी ब्रीज - सर्विस रोड ऑफ विक्रोळी ब्रिज, दक्षिण वाहिनी ते घाटकोपर ब्रिज सिग्नल - 2.5 किमी लांब ते 14 मीटर रुंद