Mumbai Maratha Protest: पोलिसांनी रस्त्यावरुन मराठा आंदोलकांच्या गाड्या हटवल्या, सीएसएमटी स्थानकाबाहेरचा रस्ता मोकळा
Mumbai Maratha Protest: मराठा आंदोलकांनी सीएसएमटी स्थानकाच्या परिसरातील रस्ता जाम केला होता. हा रस्ता आता पोलिसांनी मोकळा केला आहे. कोर्टाच्या आदेशानंतर चित्र बदललं

Mumbai Maratha Protest: गेल्या चार दिवसांपासून मुंबईतील महत्त्वाचे केंद्र असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकाच्या परिसरात मराठा आंदोलकांनी चक्का जाम केला होता. एरवी 24 तास गजबजलेल्या असणारा सीएसएमटी स्थानकाबाहेरच्या या रस्त्यावरील वाहतूक गेल्या चार दिवसांपासून जवळपास ठप्प होती. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यासोबत आलेल्या मराठा आंदोलकांनी याठिकाणी आपल्या गाड्या लावल्या होत्या. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी दक्षिण मुंबईतील आझाद मैदान वगळता सर्व परिसर खाली करावा, असे आदेश दिले होते. त्यानंतर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) कारवाईला सुरुवात केली होती. पोलिसांकडून सीएसएमटी स्थानकाबाहेरील परिसरात उभ्या असलेल्या मराठा आंदोलकांच्या (Maratha Reservation) गाड्यांना हटवले आहे. मराठा आंदोलकांच्या या गाड्या नवी मुंबईत नेण्यात याव्यात, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता सीएसएमटी स्थानकाबाहेरील रस्ता मोकळा झाला असून तेथून वाहतूक पूर्ववत सुरु झाली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनीही आझाद मैदान सोडून मराठा आंदोलकांनी इतरत्र फिरु नये, असे कालच स्पष्ट केले होते. त्यामुळे न्यायालयाच्या निर्देशानंतर आणि मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केल्यानंतर सीएसएमटी परिसर मराठा बांधवाकडून रिकामा केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून या परिसरातील वाहतूक पूर्णपणे ठप्प होती. मात्र, न्यायालयाच्या निर्देशानंतर हा परिसर पोलिसांकडून रिकामा करत वाहतूक पूर्ववत केली जात आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आणि काही निरीक्षण नोंदवल्यानंतर त्या प्रकारचे आदेश आंदोलकांसाठी बॅनर द्वारे ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. आंदोलकांना त्यामधून सूचना देण्यात आले आहेत. बारा वाजेपर्यंत मुंबईतील सर्व रस्ते मोकळे करायचे आहेत ठिकठिकाणी फिरत असून लाऊड स्पीकरद्वारे सूचना पोलिसांकडून देण्यात येत आहेत. या सगळ्या कोर्टाच्या आदेशानंतर मराठा बांधवांकडून सुद्धा सहकार्य केले जात आहे. आपल्या गाड्या जिथे पार्किंगची व्यवस्था केली आहे तिथे लावण्यात येत आहेत आणि रस्ते मोकळे केले जात आहेत .
मागील दोन-तीन दिवसांपासून दक्षिण मुंबईतील हुतात्मा चौक येथे मोठ्या संख्येने मराठा आंदोलक एकत्र जमलेले पाहायला मिळाले होते. याशिवाय या परिसरात पार्किंगचीही व्यवस्था त्यांच्यासाठी करण्यात आली होती.त्यामुळे हुतात्मा चौकातून पुढे मार्गस्थ होणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होत होता. मात्र, आता मुंबईतील रस्ते कोर्टाच्या निर्देशानंतर मोकळे करण्यास मराठा बांधवांनी सहकार्य केल्याचे दिसते. हुतात्मा चौकातून पुढे जाणारा रस्ता हा मोकळा करून देण्यात आला आहे. पार्किंगमधील अनेक गाड्या वाशी आणि वाडीबंदर या ठिकाणी पार्किंग साठी जात आहेत. त्यामुळे हुतात्मा चौकाच्या ठिकाणची वाहतूक सुद्धा सुरळीत पाहायला मिळत असून आंदोलकांची गर्दीसुद्धा कमी झाली आहे.
आणखी वाचा

























