MNS Protest On Toll : टोल नाक्यावरून विना टोल वाहने सोडणाऱ्या मनसैनिकांची पोलिसांकडून धरपकड; पोलीस ठाण्यात रवानगी
Raj Thackeray On Toll Plaza : मनसैनिकांच्या आक्रमक पावित्र्यानंतर पोलिसांनी परिस्थिती चिघळू नये यासाठी टोल नाक्यावर धाव घेत कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
मुंबई/ वाशी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी टोलबाबत (Toll) घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर मनसैनिकांनी (MNS supporters) टोल नाक्यावर उभे राहत चार चाकी वाहने सोडली. त्यानंतर पोलिसांनी मनसैनिकांची पोलिसांनी धरपकड केली. वाशी आणि दहिसर टोल नाक्यावरून कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत टोलच्या मुद्यावर आक्रमक भूमिका घेतली. वाहन चालकांना टोल न देण्याचे आवाहन राज यांनी केले. ज्या टोल नाक्यावरून टोल घेतला जाईल, तो टोल नाका पेटवून देण्याचा इशारा राज ठाकरे यांनी दिला. राज यांच्या पत्रकार परिषदेनंतर मनसैनिकांना टोल नाक्यावर जात वाहने टोलशिवाय सोडण्यास सुरुवात केली.
मनसैनिकांच्या आक्रमक पावित्र्यानंतर पोलिसांनी परिस्थिती चिघळू नये यासाठी टोल नाक्यावर धाव घेतली. वाशी टोल नाक्यावर आंदोलन करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले. मनसेच्या 25 ते 30 कार्यकर्त्यांना वाशी पोलिसांनी ताब्यात घेत त्यांना पोलीस ठाण्यात नेले.
तर, दुसरीकडे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील दहिसर टोल नाक्यावर आंदोलन करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली. या ठिकाणाहून 20 ते 25 मनसे कार्यकर्त्यांना दहिसर पोलिसांनी ताब्यात घेतले.
दहिसर पोलिसांना मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार चाकी वाहनांच्या टोल माफीबाबत केलेल्या वक्तव्याची व्हिडीओ क्लिप दाखवली. मात्र, प्रत्यक्षात दहिसर टोल नाक्यावर चार चाकी गाड्यांचा टोल घेतला जात होता.
राज ठाकरे काय म्हणाले?
महाराष्ट्रात प्रत्येक राजकीय पक्षाने टोलमुक्तीची घोषणा केली होती. त्याबाबत राज ठाकरे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उद्धव ठाकरेंचे व्हिडीओ दाखवले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात लहान वाहनांना टोलच नाही असं म्हटलं होतं. त्यावर राज ठाकरे यांनी "देवेंद्र फडणवीस धादांत खोटं बोलतायत, त्यांनी टोलनाक्याबाबत केलेल्या वक्तव्याची शहानिशा आम्ही टोलवर जाऊन करु. टोल हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा आहे. त्याची शहानिशा झाली पाहिजे. मी मुख्यमंत्र्यांना भेटणार. आमची माणसं टोलनाक्यावर उभी राहतील, फडणवीसांनी सांगितल्याप्रमाणे लहान वाहनांना टोल लावू दिला जाणार नाही, जर याला विरोध केला तर हे टोलनाके आम्ही जाळून टाकू"
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?
जी घोषणा आम्ही टोलमुक्तीची केली होती, त्यानुसार राज्यातील सर्व टोलवर छोट्या गाड्यांना त्यांना आम्ही मुक्ती दिली आहे. केवळ व्यावसायिक वाहनांकडूनच आम्ही टोल घेतो. त्याचे पैसे राज्य सरकारने दिलेले आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.