(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Omicron : ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत रॅली, मोर्चांना बंदी
ओमायक्रॉनचा (Omicron) वाढता धोका लक्षात घेता मुंबईत (Mumbai Police) सतर्कता बाळगली जात आहे. मुंबई पोलिसांनी Omicron च्या पार्श्वभूमीवर रॅली, मोर्चांना बंदी घातली आहे.
Mumbai Omicron Update : ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता मुंबईत (Mumbai Police) सतर्कता बाळगली जात आहे. मुंबई पोलिसांनी Omicron च्या पार्श्वभूमीवर रॅली, मोर्चांना बंदी घातली आहे. दुसरीकडे पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही एमआयएम रॅलीवर ठाम आहे. मुस्लिम आरक्षणासह वेगवेगळ्या मागण्यांसाठी 300 गाड्यांचा ताफा मुंबईच्या दिशेनं रवाना होणार असल्याची माहिती आहे.
ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गामुळे राजकीय पक्षांना मुंबईत रॅली काढण्यास परवानगी नाकारण्यात आलीय. अमरावती, मालेगाव, नांदेडमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतलाय. राज्यातील ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. राज्यात नव्या 7 ओमायक्रॉन रुग्णांची नोंद झाली आहे. यातील तीन रुग्ण मुंबईत आहेत. तर चिंतेची बाब म्हणजे गर्दीचं ठिकाण असलेल्या धारावीत आता ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे.
धोकादायक देशामधून येणाऱ्या प्रवाशांवर बारीक नजर
राज्यात कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉन (Omicron) हळूहळू हात पसरतोय. धोकादायक देशामधून येणाऱ्या प्रवाशांवर बारीक नजर ठेवली जात असली तरी ओमायक्रॉन संकट देशात येऊन ठेपलं आहे. आता धारावीत देखील ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे. पूर्व आफ्रिकेतील टांझानिया येथून आलेल्या एका व्यक्तीला ओमायक्रॉनची लागण झाली आहे. पूर्व अफ्रिकेतील टांझानिया येथून आलेला या व्यक्तीचा कोविड रिपोर्ट काही दिवसांपूर्वी पॉझिटीव्ह आला होता. त्याचे स्वॅब जिनोम सिक्वेंसिंगकरता कस्तुरबा रुग्णालयातील प्रयोगशाळेत पाठवला होता. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून त्याला ओमायक्रॉनची लागण झाली आहे. कोविड रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर या व्यक्तीला सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे होते. या व्यक्तीला कोणतीही लक्षणे नाहीत. या व्यक्तीच्या निकट संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी केली गेली आहे. आज धारावीतील एकाला आणि या अगोदर मुंबईतील दोन जणांना ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झाल्याचे सिध्द झाले आहे . यामुळे महाराष्ट्रातील ओमायक्रॉन विषाणू आढळलेल्या रुग्णांची संख्या आता 11 झाली आहे.
राज्यात 10 ओमायक्रॉन रुग्णांवर उपचार सुरू
राज्यात 10 ओमायक्रॉन रुग्णांवर उपचार सुरू आहेत त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झालीय. या नव्या विषाणूबाबत अनेकांमध्ये भितीचं वातावरण आहे. दरम्यान यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी म्हटलं आहे की, धारावीनं यापूर्वीही शून्य रुग्ण आकडा अनेकदा गाठला आहे. धारावी लढलीय त्यामुळं घाबरुन जाऊ नये, असं त्यांनी म्हटलं आहे. या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं कडक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. धोकादायक देशामधून येणाऱ्या प्रवाशांवर बारीक नजर ठेवली जात आहे. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी पाच सूत्री अॅक्शन प्लॅन तयार केला आहे.