दहा महिन्यांपासून वेतन नाही, सुरक्षारक्षकांवर व्याजाने पैसे घेऊन कुटुंब चालवण्याची वेळ
मागील दहा महिन्यांपासून वेतन न मिळाल्यामुळे राज्यातील सुरक्षारक्षकांवर आणि त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. काही कर्मचाऱ्यांना तर घरखर्चासाठी बायकोचे मंगळसूत्र गहाण ठेवलं आहे.

मुंबई : कोरोना व्हायरसमुळे राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. अशावेळी कोरोना व्हायरसविरोधात हजारों डॉक्टर लढाई लढत होते. या काळात वेगवेगळ्या रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरांची आणि रुग्णालयांच्या सुरक्षेची जबाबदारी जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाच्या कर्मचाऱ्यांवर होती. या कर्मचाऱ्यांनीही दिवसरात्र एक करुन आपली जबाबदारी पार पाडली. पण मागील दहा महिन्यांपासून वेतन न मिळाल्यामुळे आता राज्यातील सुरक्षारक्षकांवर आणि त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
सध्या अनेक सुरक्षारक्षक असे आहेत जे व्याजाने पैसे घेऊन आपलं कुटुंब चालवत आहेत. राज्यात जवळपास आठ हजारांच्या आसपास विविध सरकारी कार्यालयात हे सुरक्षारक्षक काम करत आहेत. जर आता पगार मिळाला नाही तर आम्ही उपोषणाला बसू असा पवित्रा जिल्हा सुरक्षारक्षक मंडळातील कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. याबाबत बोलताना महाराष्ट्र राज्य सुरक्षारक्षक न्याय संघटनेचे सल्लागार उमेश बैरागी म्हणाले की, "राज्य शासनाच्या आरोग्य विभागात विविध जिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयात सुरक्षारक्षक काम करत आहेत. सुरक्षारक्षकांना मागील दहा ते अकरा महिन्यांपासून वेतन मिळालेलं नाही. आमच्यातील असे काही कर्मचारी आहेत त्यांना पगार नसल्यामुळे बायकोचे मंगळसूत्र गहाण ठेवण्याची वेळ आली आहे. याबाबत सुरक्षा मंडळाकडे चौकशी केली असता शासनाकडून निधी आला नसल्याचं सांगण्यात येतं आहे. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर निधी वितरित करुन आमच्या कर्मचाऱ्यांचे पगार करावेत."
याबाबत बोलताना संघटनेचे सरचिटणीस प्रथमेश अल्लाट म्हणाले की, "कोरोनाचे संकट असताना अनेक सुरक्षारक्षकांना वेतन मिळालेलं नाही. सध्या लॉकडाऊनमध्ये सुरक्षारक्षकांना एक हजार रुपये वेतन भत्ता देण्यात येत आहे. परंतु अनेकांना बस मिळत नसल्यामुळे दुचाकी किंवा रिक्षाचा आधार घ्यावा लागत आहे. यामध्ये हा खर्च देखील निघत नाही. त्यामुळे शासनाने कर्मचाऱ्यांचा भत्ता 3 हजार रुपये करावा. मागील 10 महिन्यांपासून पगार रखडल्यामुळे अनेकांना आपल्या कामाच्या तासांनंतर दुसरीकडे मोलमजुरी करावी लागत आहे."
"जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाकडे पगार मागितल्यास शासनाने निधी दिला नसल्याचं सांगण्यात येते. सुरक्षारक्षकांना हे थकित वेतन तत्काळ देण्यात यावे. वर्षभरात अनेकांनी घर खर्चासाठी कर्ज काढले आहे तर अनेकांना हात उसने घेऊन आपलं कुटुंब चालवलं आहे. सध्याच्या परिस्थिती आगाऊ दोन ते तीन महिन्याचे वेतन मिळते, परंतु ते देण्यातच संपून जाते. घर खर्च चालवण्यासाठी पुन्हा हातउसने घेण्याची वेळ येते किंवा कर्ज काढावे लागते," असं ठाणे जिल्ह्याचे सल्लागार खुंटे यांनी सांगितलं.
























