Arthur Road Jail मध्ये नवे 9 व्हीव्हीआयपी बॅरेक, पुढचा नंबर कोणाचा?
Arthur Road Jail मध्ये नऊ नवीन व्हीव्हीआयपी बॅरेक बनवण्यात आले आहेत. या नवीन बॅरेकमध्ये कोणाची रवानगी होते? नेता की इतर कोणी हे तर काळच सांगेल पण तयारी पूर्ण आहे. म्हणूनच प्रश्न विचारला जात आहे की अगला नंबर किसका?
Arthur Road Jail : संजय राऊत (Sanjay Raut), अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि नवाब मलिक (Nawab Malik) या तिघांचं सध्याचं ठिकाण म्हणजे आर्थर रोड जेल (Arthur Road Jail). या तीन व्हीव्हीआयपी कैद्यांना इतर काही व्हीव्हीआयपी आरोपींची साथ लवकरच आर्थर रोड जेलमध्ये मिळणार आहे का, हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे आर्थर रोड जेलमध्ये नऊ नवीन व्हीव्हीआयपी बॅरेक बनवण्यात आले आहेत. आत हे बॅरेक कोणत्या व्हीआयपीसाठी असतील हे येणार काळच सांगेल. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच काही मोठी नावं आर्थर रोड जेलमध्ये पोहोचतील आणि त्यासाठीच ही तयारी असल्याचं सांगितलं जात आहे.
विजय मल्ला, निरव मोदी या 9 बॅरेकमध्ये?
हजारों कोटींचा घोटाळा करुन परदेशात फरार झालेल्या विजय मल्ल्या आणि निरव मोदी या 9 बॅरेकचा भविष्यात वापर करु शकतात. कारण दोघांना भारतात आणून त्यांच्याविरुद्ध लवकरात लवकर खटला चालवण्याचा प्रयत्न भारत सरकार करत आहेत. नीरव मोदी आणि मल्ल्या या दोघांनीही भारताकडे प्रत्यार्पण केल्यास आर्थर रोड तुरुंगाच्या 12 क्रमांकाच्या बॅरेकमध्ये ठेवण्याचा प्रस्ताव होता. या बॅरेकची रेकी, त्याचा व्हिडीओ यूके कोर्टात सादरही करण्यात आला होता. पण आता तयार झालेल्या या नवीन बॅरेकचे नवीन पाहूणे ते दोघे असतील.
पण ही तर झाली दोन नावं, इतर बॅरेकमध्ये भविष्यात कोण येतील याबद्दल आता कुणीच काही सांगू शकत नाही. पण येणारी व्यक्ती व्हीआयपी असेल हे निश्चित. राजकीय वर्तुळात या घडीला ईडीच्या रडारवर आता कोण, याची सतत चर्चा असते. म्हणून भविष्यात इथे येणारी व्यक्ती ही राजकीय असल्याचंही बोललं जात आहे.
कसे आहेत हे नवीन 9 बॅरेक?
- हे नवीन 9 बॅरेक ग्राऊंड प्लस वन या स्ट्रक्चरचे आहेत. या बॅरेकमध्ये जवळपास 8 सेल आहेत.
- तिथे संलग्न स्नानगृहे आहेत आणि कैद्यांना मेलामाईन क्रॉकरीसह गादी, उशी आणि बेडशीट पुरवले जाते.
- यासोबत या बॅरेकमध्ये पंखा आणि टीव्ही सेटही असतो.
- हे बॅरेक तुरुंगाच्या इतर भागांपेक्षा वेगळे असतात जिथे गर्दी नसते.
या नवीन बॅरेकमध्ये कोणाची रवानगी?
जेल प्रशासन या नवीन बॅरेकबद्दल कोणतीही माहिती द्यायला तयार नाही. फक्त एवढं सांगितलं जात आहे की जेलमध्ये वाढती गर्दी आणि जागेची कमतरता पूर्ण करण्यासाठी हे बॅरेक बनवले गेले आहेत. पण प्रश्न असा आहे की सामान्य कैद्यांची गर्दी कमी करण्यासाठी व्हीआयपी सेल का? जर व्हीआयपी सेल बनवले गेले आहेत म्हणजेच इथे येणारा आरोपी देखील व्हीआयपीच असेल. म्हणून या नवीन बॅरेकमध्ये कोणाची रवानगी होते? नेता की इतर कोणी हे तर काळच सांगेल पण तयारी पूर्ण आहे. म्हणूनच प्रश्न विचारला जात आहे की अगला नंबर किसका?