Mumbai News : मांजरींसोबत खेळतो, मागे लागतो म्हणून महिलेचा कुत्र्यावर अॅसिड हल्ला; एक डोळा निकामी झालेल्या कुत्र्यावर उपचार सुरु
मुंबई : एकतर्फी प्रेमातून हल्ला तरुणींवर अॅसिड हल्ला झाल्याची घटना आपण अनेकदा ऐकल्या असतील किंवा पाहिल्या असतील. मात्र मुंबईतील एका महिलेने कुत्र्यावर अॅसिड हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मुंबई : एकतर्फी प्रेमातून हल्ला तरुणींवर अॅसिड हल्ला झाल्याची घटना आपण अनेकदा ऐकल्या असतील किंवा पाहिल्या असतील. मात्र मुंबईतील (Mumbai) एका महिलेने कुत्र्यावर अॅसिड हल्ला (Acid Attack) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित कुत्रा हा मांजरींसोबत (Casts) खेळतो आणि त्यांच्या मागे लागतो, त्रास देतो या कारणावरुन महिलेने कुत्र्यावर अॅसिड हल्ला केल्याचं समोर आलं.
मुंबई पश्चिम उपनगरातील मालाड मालवणीमध्ये हा प्रकार समोर आला आहे. मालवणीमधील सामनानगर परिसरातील स्वप्नपूर्ती या इमारतीमध्ये हल्ला करणारी महिला राहते. सबिस्ता सुहेल अन्सारी असं महिलेचं नाव आहे. या 35 वर्षीय महिलेकडून कुत्र्यावर अॅसिड अटॅक करण्यात आला. ही घटना बुधवारी (16 ऑगस्ट) रात्री उशिरा घडली.
...म्हणून कुत्र्यावर अॅसिड हल्ला
सबिस्ता सुहेल अन्सारी या महिलेने आपल्या घरात मांजर पाळलेली आहे. संबंधित कुत्रा या मांजरीबरोबर खेळत असतो. तसंच मांजरीच्या पाठीमागे लागतो. त्याचाच राग मनात धरुन या महिलेने कुत्र्यावर अॅसिड हल्ला केला. महिलेच्या हल्ल्यात कुत्रा जखमी झाला असून संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.
कुत्र्याचा डोळा निकामी, शरीरावर गंभीर जखमा
या हल्ल्यात कुत्र्यांला गंभीर दुखापत झाली आहे. त्याचा एक डोळा निकामी झाला असून शरीरावर गंभीर जखमा झाल्या आहेत. टीव्ही अभिनेत्री जया भट्टाचार्य यांनी कुत्र्याला त्यांच्या थँक यू अर्थ या एनजीओमध्ये नेलं. एनीओद्वारे संचालिक वैद्यकीय केंद्रात कुत्र्याला दाखल केलं असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
बाळासाहेब भगत यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, "हा कुत्रा गेल्या पाच वर्षांपासून इमारतीमध्ये राहतो आणि रहिवासी त्याला खाऊ घालतात. तर संबंधित महिला देखील अनेक वर्षांपासून याच इमारतीत राहते आणि परिसरातली मांजरींना खाऊ घालते. मांजरांसोबत खेळताना दिसला किंवा पाठलाग करताना दिसला तर ही महिला त्याला हुसकावून लावत असेल. रात्री साडेबाराच्या सुमारास मी इमारतीच्या सोसायटी कार्यालयात असताना मला कुत्र्याच्या भुंकण्याचा आणि मोठ्याने विव्हळताना आवाज आला. तर संध्याकाळी मला समजलं की, कोणीतरी कुत्र्यावर हल्ला केला असून त्यात तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर असॅडने हल्ला झाल्याचं समोर आलं. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फूटेज तपासलं असता दिसलं की कुत्र्याच्या आजूबाजूला कोणी नसल्याचं पाहून सबिस्ता अन्सारीने बॉटलमधून अॅसिड फेकलं, ज्यात त्याला गंभीर दुखापत झाली. यानंतर कुत्रा विव्हळत पळत जाताना दिसत आहे."
महिलेविरोधात गुन्हा दाखल
सोसायटीच्या अध्यक्षांनी अॅसिड अटॅक करणारी महिला सबिस्ता सुहेल अन्सारी हिच्याविरोधात मालवणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर मालवणी पोलिसांनी आयपीसीच्या कलम 429, प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्याचे कलम 11 (1), आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम 119 अंतर्गत गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
हेही वाचा