(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai News : मढ, मार्वेमधील 49 अनधिकृत स्टुडिओ पाडण्याचे काम सुरु, किरीट सोमय्या यांचं ट्वीट
Mumbai News : मुंबईतील मालाडजवळच्या मढ, मार्वेमधील 49 अनधिकृत स्टुडिओ पाडण्याचे काम सुरु झाल्याचं ट्वीट भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलं आहे. भ्रष्टाचाराचे स्मारक असलेले हे सर्व स्टुडिओ आम्ही तोडून टाकू," असं सोमय्या यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
Mumbai News : मुंबईतील (Mumbai) मालाडजवळच्या मढ, मार्वेमधील 49 अनधिकृत स्टुडिओ पाडण्याचे काम सुरु झाल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी दिली. त्यांनी याबाबत ट्वीट करत राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि कॅबिनेट मंत्री अस्लम शेख (Aslam Shaikh) यांच्यावर निशाणा साधला आहे. "आज सकाळी मिलेनियर सिटी स्टुडिओ पाडण्याचे काम सुरु झालं आहे. आदित्य ठाकरे, अस्लम शेख यांच्या कृपेने 1000 कोटी रुपयांचे मढ, मार्वेमध्ये 49 अनधिकृत स्टुडिओ बांधले आहेत. भ्रष्टाचाराचे स्मारक असलेले हे सर्व स्टुडिओ आम्ही तोडून टाकू," असं किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
मढ मार्वे के 49 अनाधिकृत स्टुडीओ गिराने का काम शुरू हो चुका है!
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) September 13, 2022
आज सुबह में मिलेनियर सिटी स्टुडिओ तोडने का काम शुरू हो चुका है
ठाकरे सरकारके मंत्री आदित्य ठाकरे, मंत्री असलम शेख की कृपा से 1000 करोड़ के 49 अनधिकृत स्टुडिओ बने हैं। हम ये सब भ्रष्टाचार के स्मारक स्टुडिओ टूटेंगे pic.twitter.com/Lpi84ZRj3A
मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर महापालिकेच्या पी उत्तर विभागाने या स्टुडिओवर कारवाई केली. संबंधित स्टुडिओ सीआरझेड तीनमध्ये येत असल्याने कारवाई करण्यात आली. मुंबई महापालिकेने संबंधित स्टुडिओला तात्पुरते बांधकाम करण्याची परवानगी 2021 मध्ये दिली होती आणि त्याची मुदत मे 2022 मध्ये संपली होती. तसंच या बांधकामासाठी महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट एथोरिटीची परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे त्यावर कारवाईचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते.
नियमांचं उल्लंघन करुन 49 स्टुडिओचं बांधकाम, किरीट सोमय्यांचा आरोप
भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या आरोपांनुसार, "मढ, मार्वेमध्ये 49 फिल्म स्टुडिओमध्ये कथित भ्रष्टाचार झाला आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना कॅबिनेट मंत्री असलेल्या अस्लम शेख यांनी हे स्टुडिओ बांधल्याचा आरोप केला आहे. तसंच यामध्ये CRZ आणि NDZ च्या नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. बनावट कागदपत्रे, खोट्या परवानगीच्या मदतीने हजारो चौरस मीटर जागेवर अनधिकृतपणे स्टुडिओ उभारण्यात आल्याचा आरोप आहे. यामध्ये बीएमसी आणि एमसीझेडएमए (महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी)च्या अधिकाऱ्यांसोबतही संगनमत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
मुंबई महापालिकेकडून चौकशी समितीची स्थापना
मढ, मार्वेमधील कथित अवैध स्टुडिओ प्रकरणी मुंबई महापालिकेने मागील आठवड्यात मनपा उपायुक्त हर्षद काळे (Harshad Kale) यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. बीएमसीचे आयुक्त इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी या समितीची स्थापना केली असून या समितीला आपला अहवाल चार आठवड्यांत सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. किरीट सोमय्या यांनी दोन्ही माजी मंत्र्यांवर एक हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप करत याप्रकरणी चौकशीची मागणी केली होती.