बदलापुरात रेल्वे खोळंबली; रूळ दुरूस्ती वाहनातील बिघाडामुळे अपघात, दोन कामगार जखमी एकाचा मृत्यू
रेल्वे रूळांच्या दुरूस्तीच्या कामादरम्यान, टीआरटी मशीनमध्ये बिघाड झाला. यावेळी मशीन मधील स्लीपर्स तीन कामगारांच्या अंगावर पडले
बदलापूर : बदलापूर आणि अंबरनाथ स्थानकादरम्यान मध्यरात्री सुरू असलेल्या रेल्वे रूळांच्या दुरूस्तीच्या कामादरम्यान, टीआरटी मशीनमध्ये बिघाड झाला. यावेळी मशीन मधील स्लीपर्स तीन कामगारांच्या अंगावर पडल्याने या अपघातात तीन कंत्राटी कामगार गंभीर जखमी झाले. या जखमी कामगारांमधील एका कामगाराचा मृत्यू झाला. या अपघातामुळे बदलापुरहून मुंबईकडे जाणारी रेल्वेसेवा तब्बल पाच तास ठप्प होती.
रेल्वे वाहतूक खोळंबल्यामुळं कर्जत ते बदलापूरपर्यंतच्या प्रवाशांचा खोळंबा झाला. सकाळी पावणे दहाच्या सुमारास रेल्वेसेवा पुन्हा सुरू करण्यात आली. त्यामुळे बदलापूर स्थानकात प्रवाशांची गर्दी झाली होती. रेल्वेसेवा ठप्प असल्याने त्याचा भार रस्ते वाहतुकीवरही पहायला मिळाला.
अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे रात्री दोन ते पाच वाजेच्या दरम्यान मेगा ब्लॉक घेऊन रेल्वे रूळ दुरुस्तीचे काम रेल्वेप्रशासाने हाती घेतले होते. बदलापूर ते अंबरनाथ स्थानकादरम्यान डाऊन ट्रॅकवर सिमेंटचे स्लीपर ब्लॉक रुळावर टाकण्याचे काम चालू असताना TRT ( ट्रॅक रिलाइन मशीन स्लीपर टाकण्याचे मशीन ) मशीन मध्ये बिघाड झाला. त्या मशीनमधील 12 स्लीपरचा बंडल घसरून राजू झुगारे या 35 वर्षीय कामगाराचा कामगाराचा जागीच मृत्यू झाला.
'हा' भारतीय क्रिकेटपटू प्रत्येक मालिकेनंतर दान करतो किट बॅग
अपघतातील जखमी कामगारांना रेल्वे हॉस्पिटल कल्याण येथे उपचारासाठी नेण्यात आलं. पण, प्रकृती चिंताजनक असल्यामुळं त्यांना सायन रुग्णलायत हलवण्यात आलं आहे. दरम्यान, या अपघातामुळे बदलापूर ते अंबरनाथ रेल्वे सेवा ठप्प झाली होती. लोकल सेवा ठप्प झाल्याने सकाळच्या सुमारास रेल्वे स्थानकावर असलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे मात्र हाल झाले. स्थानक परिसरातील रिक्षा आणि बस स्थानकावर एकच गर्दी दिसून येत होती. याच दरम्यान सुमारे साडे दहा वाजण्याच्या सुमारास ही मशीन बाजूला हटवण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले. 10 वाजून 52 मिनिटांनी पहिली लोकल बदलापूरहुन सीएसटीच्या दिशेने मार्गस्थ झाली. मात्र रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने बदलापूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची एकच गर्दी दिसुन आली. अपघात स्थळी मध्य रेल्वे अधिकाऱ्यांनी भेट दिली असून या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाने दिले आहेत. अद्यापही रेल्वे सेवा पूर्णपणे पूर्ववत येण्यास काहीसा वेळ जाऊ शकतो.