(Source: ECI/ABP News/ABP Majha)
1001 कोरोनाबाधित मातांची यशस्वी प्रसुती; नायर रुग्णालयाच्या कामगिरीचं आदित्य ठाकरेंकडून कौतुक
मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयाने कोरोना महामारीत आतापर्यंत 1001 कोरोनाबाधित मातांची यशस्वी प्रसुती करण्याची कौतुकास्पद कामगिरी केली आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबत रुग्णालयाच्या डॉक्टर, नर्स यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं आहे.
मुंबई : कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबईला बसला असला तरी दक्षिण मुंबईतील महापालिकेच्या रुग्णालयाने या महामारीत आतापर्यंत 1001 कोरोनाबाधित मातांची यशस्वी प्रसुती केली आहे. मुंबई महापालिकेकडून याबाबतची माहिती देण्यात आली. यानंतर राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनीही रुग्णालयातील डॉक्टर, नर्स यांच्यासह कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं आहे.
A must read! Hearty congratulations to our Doctors, medicos, nurses and interns at Nair Hospital for ensuring deliveries of babies from covid infected mothers since last year! @mybmc https://t.co/5xAwLkzNja
— Aaditya Thackeray (@AUThackeray) May 5, 2021
बीवायएल नायर रुग्णालयाने ही कौतुकास्पद कामगिरी केली आहे. रुग्णालयातील प्रसुतीशास्त्र, नवजात आणि बालरोगशास्त्र आणि अॅनेस्थेसिओलॉजी या विभागांच्या यासाठी अथक परिश्रम केले, असं बीएमसीने आपल्या परिपत्रकात म्हटलं आहे.
एप्रिल 2020 मध्ये नायर रुग्णालय हे कोविड-19 म्हणून घोषित करण्यात आलं होतं. तर मागील वर्षी 14 एप्रिल रोजी पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाची प्रसुती झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत एक हजार कोरोनाबाधित मातांनी 1022 बालकांना जन्म दिला आहे. यामध्ये तिळे आणि 19 जुळ्यांचा समावेश आहे.
मागील एक वर्षात रुग्णालयात झालेल्या 1001 प्रसुतींपैकी 599 बालकांचा जन्म सामान्य प्रसुतीद्वारे झाला तर 402 जणांचा सिझेरियन पद्धतीने झाला. तीन विभागातील डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय आणि इतर कर्मचाऱ्यांनी अहोरात्र न थांबता, न थकता यासाठी काम केलं.
कोविड-19 चा संसर्ग जन्मजात होत नाही. माता जरी कोरोनाबाधित असली तर पोटातील बाळाला संसर्ग होत नाही. परंतु जन्मानंतर आई आणि बाळाचा संपर्क आल्यानंतर संसर्ग होऊ शकतो, असं नायर रुग्णालयातील डॉक्टर सुषमा मलिक यांनी सांगितलं.
नियमानुसार,आई कोरोनाबाधित असेल तर जन्माना आलेल्या बाळाची कोविड-19 चाचणी करणं बंधनकारक आहे. मागील एक वर्षात अनेक बालकं कोरोनाबाधित आढळली, परंतु त्यांच्या कोणतीही लक्षणे नव्हती. या बालकांची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला, असं बीएमसीने पत्रकात म्हटलं आहे.