मुंबईतील वाडी बंदरमध्ये चोर असल्याच्या संशयातून तरुणाची हत्या
मुंबईतील वाडी बंदर इथे चोर असल्याच्या संशयातून एका 23 वर्षीय तरुणाला जबर मारहाण करण्यात आली. या घटनेत त्याचा मृत्यू झाला असून दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
मुंबई : चोर असल्याच्या संशयातून महापालिकेच्या कंत्राटदाराच्या सुरक्षारक्षकांनी केलेल्या मारहाणी एका तरुणाचा मृत्यू झाला. मुंबईच्या वाडी बंदर परिसरात रविवारी (25 ऑक्टोबर) ही घटना घडली. मंगेश कोडर आणि सूरज बोलके अशी या आरोपींची नावे आहेत. तर हत्या झालेल्या 23 वर्षीय तरुणाचे नाव माजिद अली आहे.
वाडी बंदर येथील तंबाकू गल्लीमध्ये काल महापालिकेच्या कंत्राटदाराच्या तात्पुरत्या बनवण्यात आलेल्या ऑफिसबाहेर माजिद अली संशयास्पदरित्या घुटमळत होता. हे तेथील कंत्राटदाराच्या सुरक्षारक्षक मंगेश आणि सूरज यांनी पाहिले. त्यांनी त्याला हटकले असता त्यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी सूरज आणि मंगेशने लाकडी दांड्यानी माजिदला मारहाण केली आणि तिथून ते पळून विरारला घरी गेले.
इकडे एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याची तक्रार डोंगरी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे या घटनेचा शोध घेतला. यानंतर मारहाण करणाऱ्या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली.