'माझा लढा विठ्ठलाशी नाही, त्याच्या भोवतालच्या बडव्यांशी आहे...', शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' केलेले राज ठाकरे पुन्हा करिष्मा करणार का?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी 16 वर्षांपूर्वी, 27 नोव्हेंबर 2005 रोजी शिवसेना सोडताना ऐतिहासिक भाषण केलं होतं. तो महाराष्ट्रातल्या राजकारणाला कलाटणी देणारा असा क्षण होता.
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब हेच आपले दैवत आहेत. मात्र आपल्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे. माझा लढा हा विठ्ठलाशी नाही तर त्याच्या भोवतालच्या बडव्यांशी आहे... हे शब्द होते राज ठाकरेंचे. आजपासून बरोबर 16 वर्षांपूर्वी राज ठाकरेंनी शिवसेना सोडली. त्यावेळी त्यांच्या समर्थकांना संबोधित करताना राज ठाकरेंनी एक ऐतिहासिक असं भाषण दिलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी मिळाली.
राज ठाकरे म्हणजे त्या वेळच्या शिवसेनेची मुलुखमैदान तोफ. बाळासाहेब ठाकरेंची हुबेहुब शैली आणि आवाजातील करारीपणा...एखाद्या मुद्द्यावर असलेले स्पष्ट विचार आणि पक्ष संघटनेवर असलेली पकड.... या सर्व गुणांमुळे राज ठाकरे हेच शिवसेनेचे उद्याचं नेतृत्व असल्याचं अनेकजण बोलत होते. पण उद्धव ठाकरेंच्या वाढत्या सक्रियतेमुळे राज ठाकरेंची कुचंबणा होत गेली. त्यांची पक्षातील घुसमट वाढत गेली. मुंबईची जबाबदारी अप्रत्यक्षपणे हातातून काढून घेऊन त्यांना नाशिकची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर अशा अनेक घटना घडत गेल्या की ज्यामुळे राज ठाकरेंची शिवसेनेत घुसमट वाढत गेली.
अखेर 27 नोव्हेंबर 2005 रोजी ही घुसमट संपली, राज ठाकरेंचे मौन संपले, त्यांनी शिवसेना सोडायचा निर्णय घेतला. आपल्या दादर येथील 'कृष्णकुंज' या निवासस्थानी त्यांचे राज्यभरातील समर्थक गोळा झाले.
"शिवसेना संपवायला निघालेल्या चार कारकुनांच्या कंपूच्या पापात वापल्याला वाटेकरी व्हायचं नाही. शिवसेना प्रमुखच आपले दैवत आहे. मात्र या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं असून त्यांच्यासोबत आपल्याला काम करायची इच्छा नाही. आपला लढा हा विठ्ठलाशी नाही तर बडव्यांशी आहे" असं राज ठाकरे म्हणाले होते. यावेळी आपण शिवसेना पक्षाच्या नेतेपदाचा आणि विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचं त्यांनी जाहीर केलं.
शिवसेनेसाठी आपण सर्वस्व दिलं पण आपल्या वाट्याला वाईट वागणूक आली. शिवसेना संपवायची माझी इच्छा नाही. पक्षातल्या चार-सहा माणसांनी चुका करायच्या आणि त्यांच्यासाठी निवडणुकीचा प्रचार आपण करायचा हे जमणार नाही असं राज ठाकरे म्हणाले होते. काही दीडदमडीच्या लोकांना राजकारण समजत नाही, असे लोक आता शिवसेना चालवत असल्याची टीकाही त्यांनी केली.
यानंतर राज ठाकरेनी मराठी माणसाच्या हक्कासाठी लढण्याचं जाहीर केलं आणि 9 मार्च 2006 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. 2009 सालच्या विधानसभा निवडणुकीत या पक्षाने तब्बल 13 जागा जिंकल्या. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतही जलवा दाखवला. पण मनसेला हे यश टिकवता आलं नाही हे वास्तव आहे. आज या पक्षाचा केवळ एक आमदार आहे.
पण राज ठाकरे हे करिष्मा असलेले नेते आहेत. ज्यावेळी त्यांनी मनसेची स्थापना केली होती त्यावेळी राज्यातील घराघरातील, कानाकोपऱ्यातील विशीतला युवक वर्ग त्यांचा समर्थक होता, आजही आहे. त्यावेळी असं म्हटलं जायचं की, घरातला आजोबा कॉंग्रेस-राष्ट्रवादीमध्ये, बाप शिवसेनेमध्ये आणि पोरगा मनसेमध्ये आहे.
आज आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना एका अर्थाने मॉडर्न होत आहे, पक्षात नवनवीन बदल घडत आहेत. त्याचवेळी मुंबईतील मराठी माणसाच्या अधिकारांसाठी ती कुठेतरी कमी पडत असल्याचं अनेकजण खासगीत बोलतात. त्यामुळे आजही मराठी माणसाच्या हक्कांचा प्रश्न ज्यावेळी येतो त्यावेळी अनेकांना राज ठाकरेंची आठवण येते.
राज ठाकरेंनी शिवसेना सोडून आज 16 वर्षे झाली. या 16 वर्षात अनेक बदल झाले. आज शिवसेना सत्तेत आहे, महापालिकेतही त्यांचं वर्चस्व आहे. मधल्या काळात राज ठाकरेंना अनेक शिलेदार सोडून गेले आणि संघटनात्मक पातळीवर मनसे दुर्बल झाली.
मुंबईतून मराठी माणसांची संख्या कमी होताना, मराठी भाषक कमी होताना, हिंदी भाषिकांचे अतिक्रमण होताना आजही अनेक मराठी भाषकांना राज ठाकरे हेच शेवटची आशा दिसतात. आता शिवसेनेला जय महाराष्ट्र करुन 16 वर्षे झाल्यानंतर राज ठाकरे पुन्हा एकदा पूर्वीचा करिश्मा दाखवतील का? मुंबईत मराठी माणसाची होणारी पिछेहाट थांबणार का? 'मराठी हृदय सम्राट' राज ठाकरे मराठी माणसाचा मसिहा बनणार का? या प्रश्नांची उत्तरं आता येणारा काळच देईल.
महत्त्वाच्या बातम्या :