Mumbai Metro : पंतप्रधानांच्या उद्घाटनानंतर मुंबई मेट्रो 2A आणि 7 ला मुंबईकरांची पसंती; आठ दिवसांत तब्बल 10 लाख प्रवाशांनी केला प्रवास
Mumbai Metro : मेट्रो लाइन 2A आणि उद्घाटनानंतर अवघ्या 8 दिवसात 7 ते 10 लाख लोकांनी प्रवास केला. मेट्रो 2A आणि 7 पश्चिम उपनगरात राहणाऱ्या लोकांसाठी वरदान ठरत आहे.
Mumbai Metro Line 2A and 7 : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलेल्या मेट्रो 2A आणि 7 चा प्रवास अगदी सुसाट चालला आहे. 20 जानेवारीपासून सर्वसामान्य मुंबईकरांसाठी सुरु झालेला प्रवास आतापर्यंत साधारण 10 लाख प्रवाशांनी केवळ आठ दिवसांत केला आहे. 19 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो 2A आणि 7 चं लोकार्पण करण्यात आलं. त्यानंतर, दुसऱ्या दिवसापासूनच हा प्रवास सर्वसामान्य मुंबईकरांसाठी सुरु झाला.
मेट्रो लाईन 2A डीएन नगर अंधेरी ते दहिसरपर्यंत धावते. तर, लाईन 7 दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्वपर्यंत धावते. या दोन्ही मेट्रो लाईन एकत्रितपणे, साधारण 35 किमीचा पल्ला पार करतात. यामध्ये साधारण एकूण 30 एलिव्हेटेड स्टेशनचा समावेश आहे. आरे ते धनुकरवाडी दरम्यान मेट्रो मार्गाचा पहिला टप्पा गेल्या वर्षी खुला करण्यात आला होता.
गेल्या वर्षी एप्रिलमध्ये मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले. तेव्हापासून आतापर्यंत 10 लाख प्रवाशांनी या मार्गावरून प्रवास केला आहे. मेट्रो मार्ग 2A आणि 7 पश्चिम उपनगरात राहणाऱ्या लोकांसाठी वरदान ठरत आहेत.
पंतप्रधानांनी उद्घाटन केल्यानंतर केवळ आठवड्याभरातच 10 लाखांहून अधिक प्रवाशांनी मेट्रो मार्ग 2A आणि 7 ने प्रवास केला. आता या दोन्ही मेट्रो मार्गिका पूर्णपणे कार्यान्वित झाला असून मेट्रो मार्ग 1 सोबत जोडल्या गेल्या आहेत. ज्यामुळे मुंबई महानगर प्रदेशात पहिले मेट्रो नेटवर्क तयार झाले आहे. या दोन्ही मेट्रो मार्गिका, मेट्रो 1 च्या माध्यमातून रेल्वे मार्गाशी सहज जोडले गेल्याने लाखो मुंबईकरांना या मेट्रोचा फायदा झाला आहे.
‘मुंबई वन कार्ड’ देखील लॉन्च
मेट्रो 2A आणि 7 च्या दुसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनाबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘मुंबई वन कार्ड’ लाँच करण्यात आले. मेट्रोने प्रवास करणारे प्रवासी हे कार्ड वापरून देशाच्या कोणत्याही भागात मेट्रोने प्रवास करू शकतात. या कार्डचा वापर करून शॉपिंग सोबत तसेच मेट्रो, बेस्ट बसची तिकिटे इत्यादी खरेदी करू शकतात. मेट्रोच्या तिकीट खिडक्यांवर हे कार्ड उपलब्ध आहेत. या कार्डमध्ये 100 ते 1000 रुपयांचे रिचार्ज करता येते. हे कार्ड ट्रेनमध्ये तसेच बसमध्ये वापरता येते. एवढेच नाही तर मुंबईकर खरेदीसाठी मुंबई वन कार्डचा वापर करू शकतात. 2015 मध्ये या दोन्ही मेट्रो मार्गांची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली होती.
महत्त्वाच्या बातम्या :
Mumbai Metro: पंतप्रधानांनी उद्घाटन केलेल्या मेट्रोतून मुंबईकरांचा प्रवास सुरु, तिकीट किती?